Vari Pandharichi 2025: चोखा म्हणे निर्मळेशी | नाम गाय अहर्निशी || उच्चारिता वाचे पाप जाय
धाडसाने आपल्यावर झालेला अन्याय त्यांनी अभंगातून मांडला
By : मीरा उत्पात
ताशी : तेराव्या शतकात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या बंदिस्त चौकटीत राहून वारकरी संप्रदायाच्या प्रभावामुळे समाजातील अनेक उच्च-नीच स्त्री-पुरुषांनी विठ्ठल भक्ती आणि तद्अनुषंगिक अभंग रचना केल्या. आपल्या व्यथा मांडल्या. संत चोखामेळ्याच्या संपूर्ण कुटुंबाने आपापल्या रचना सादर करून आपली आध्यात्मिक उंची जगाला दाखवून दिली.
खरे तर त्यांना जाती व्यवस्थेचे प्रखर चटके सहन करावे लागले होते. विठ्ठलभक्ती करणे सुद्धा अवघड होते. तरीही धाडसाने आपल्यावर झालेला अन्याय त्यांनी अभंगातून मांडला. चोखामेळ्याची धाकटी बहीण निर्मळा हिने देखील आपली व्यथा, अध्यात्म, भक्ती अभंगातून मांडली.
तिने आपला भाऊ चोखामेळा यालाच गुरू केले होते. बुलढाणा जिह्यातील मेहुणराजा इथे निर्मळाचा जन्म झाला. मेहुणराजा गावी निर्मळा नावाची नदी आहे. यावरून तिचे नाव निर्मळा ठेवले होते. या कुटुंबात पंढरीच्या वारीची परंपरा होती. एवढ्या लांबवरून वारी करणे जड जाऊ लागल्याने चोखामेळ्याचे संपूर्ण कुटुंब पंढरपूरला स्थलांतरित झाले.
इथे आल्यावर सर्वांना विठ्ठल भक्तीची गोडी लागली. सारे कुटुंब विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झाले. देवास मिळवण्यासाठी कर्मठ आणि कठीण साधना करण्याऐवजी फक्त नाम साधनेचा सोपा मार्ग त्यांनी अनुसरला. निर्मळेने हा मार्ग आपला मोठा भाऊ चोखामेळा यांनीच दिला आहे, असे एका अभंगातून सांगितले आहे. ती म्हणते
चोखा म्हणे निर्मळेशी
नाम गाय अहर्निशी
तेणे संसार सुखाचा
इह परलोकी साचा
साधन हेचि थोर असे
शांती क्षमा दया वसे
अनंत जन्माचे पाप जर घालवायचे असेल तर भगवंताचे नाम हाच त्यावरचा उपाय असल्याचे त्या ठामपणे सांगतात.
निर्मळा म्हणे अनंता जन्माचे
उच्चारिता वाचे पाप जाय
त्या काळात त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्यांनी केलेली विठ्ठल भक्ती समाजाला मान्य नव्हती. एवढेच काय समाज त्यांना माणूस म्हणून सुद्धा जगू देत नव्हता. अशा बिकट परिस्थितीतून त्यांनी आपली विठ्ठल भक्ती उत्कट अभंग लिहून प्रगट केली. संत निर्मळा यांचे फारच थोडे अभंग उपलब्ध आहेत.
जे काही आहेत ते अतिशय उच्च पातळीवरचे आहेत. त्यांचे उपलब्ध अभंग केवळ चोवीसच आहेत. त्यातून अतिशय साध्या शब्दात त्यांनी आपले विचार मांडले आहेत. चोखोबांची बहीण, शिष्या आणि संत कवियित्री अशा तीनही भूमिका तिने उत्कृष्टपणे निभावल्या.
निर्मळेचा नवरा बंका याने देखील भागवत धर्म अनुसरला होता. बंका हा चोखामेळ्याची पत्नी सोयराबाईचा भाऊ होता. गावकुसाच्या आगीमध्ये चोखामेळा याचा मृत्यू झाल्यावर निर्मळा आणि तिचा नवरा बंका पुन्हा मेहुणराजा इथे आले. निर्मळा नदी तीरावर निर्मळा आणि बंका यांच्या समाधी आहेत.
नावाप्रमाणे निर्मळ असणारी निर्मळा भागवत संप्रदायातील एक अनन्यसाधारण स्त्री संत होती. तिने आपल्या अंत:करणात चेतवलेली विठ्ठल भक्तीची भावस्पर्शी ज्योत प्रतिकूल परिस्थितीतही न मालवता प्रज्वलित ठेवली!