Karad Politics : सैदापूर सरपंच फतेसिंह जाधवांचा भाजपमध्ये प्रवेश
सैदापूर ग्रामपंचायतीत भाजपचा झेंडा फडकला
कराड : कराडजवळच्या सैदापूर ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता आणणारे विद्यमान सरपंच फतेसिंह जाधव यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
फत्तेसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच अनिल जाधव, सैदापूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रमेश जाधव, माजी चेअरमन सीताराम जाधव, माजी संचालक शरद जाधव व इतर मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार डॉ. भोसले म्हणाले, की कराडलगत असणाऱ्या सैदापूर गावची लोकसंख्या ३० ते ३५ हजारापर्यंत झाली आहे. फतेसिंह जाधव यांच्याशी अनेक दिवस चर्चा सुरू होती. गाव सुंदर करण्यासाठी व गावचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना पक्षात येण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या गावच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. आज ही ग्रामपंचायत भाजपच्या झेंड्याखाली आली आहे.