साई फॉर्म-रॉजर्स सुपर आज अंतिम लढत
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत 13 वर्षाखालील मुलांच्या विश्रुत चिट्स चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना साई फार्म स्पोर्ट्स क्लब व रॉजर्स सुपर किंग्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये होणार आहे. साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने या स्पर्धेत अपराजित झालेल्या झेवर गॅलरी डायमंड संघाचा तर रॉजर्स सुपर किंग्स संघाने के आर शेट्टी किंग्ज संघाचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. युनियन जिमखाना पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात झेवर गॅलरी डायमंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्व गाडी बाद 105 धावा केल्या. त्यात वेदांत बिजल व आऊष पुतरण यांनी प्रत्येकी 17, यश चौगुलेने 16, अम्मार पठाण व मोहम्मद हमझा यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. साई फार्म तर्फे हर्षित इनामदार व श्लोक चडिचल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 24.1 षटकात 6 बाद 106 धावा केल्या. त्यात अथर्व करडीने 5 चौकारांसह 44, ओजस गडकरीने 18, आऊष देसुरकरने 14 धावा केल्या. झेवर गॅलरीतर्फे जियान सलामवाले, लक्ष खतायत, अवनीश बसुर्तेकर, अम्मार पठाण व मोहम्मद हमझा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात रॉजर सुपर किंग्स संघाने के आर शेट्टी किंग्स संघाचा 10 गड्यानी दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. के आर शेट्टी किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात सर्व बाद 84 धावा केल्या. के आर शेट्टी किंग्स संघाचे तब्बल सात फलंदाज धावबाद झाले. त्यात मोहम्मद अब्बासने 3 चौकारांसह नाबाद 36, अतिथी भोगणने 2 चौकारांसह 20, रॉजरस तर्फे साईराज चव्हाण, जितीन दुर्गाई, अथर्व बेळगावकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर सुपर किंग्सने 13.5 षटकात सलामीच्या फलंदाजांनी सुरेख फलंदाजी करत बिनबाद विजयाचे उद्दिष्ट गाठले. त्यात कर्णधार अवनीश हट्टीकरने 11 चौकारांसह नाबाद 54, अनिश तेंडुलकर 5 चौकारांसह नाबाद 31 धावा केल्या. सामन्यानंतरप्रमुख पाहुणे धनंजय जाधव सतीश नंदुरकर व प्रदीप पाटील यांच्या हस्ते सामनावीर अथर्व करडी इम्पॅक्ट खेळाडू ओजस गडकरी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आला. प्रमुख पाहुणे उपमहापौर आनंद चव्हाण रोहित फगरे जिमखाना संचालक चेतन बैलूर यांच्या हस्ते सामनावीर अवनीश हट्टीकर इम्पॅक्ट खेळाडू अनिश तेंडुलकर यांनासन्मानित करण्यात आले. अंतिम सामना शनिवार दिनांक 4 मे रोजी होणार आहे.