सह्याद्री-काळी व्याघ्रभ्रमण मार्ग
महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र राखीव ते कर्नाटकातील काळी व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बाहेर पूर्वापार जे पट्टेरी वाघांचे वास्तव्य आणि भ्रमणमार्ग अस्तित्वात आहे, त्यावर आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रदान केलेल्या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. या संदर्भात वन्यजीव संवर्धन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारच्या कोल्हापूर वनविभागाने जो हल्लीच अहवाल प्रकाशित केलेला आहे, त्याद्वारे सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राच्या कक्षेबाहेर महाराष्ट्राचा जंगलाचा जो पट्टा आहे, त्यात गोवा-कर्नाटकाच्या सीमेपर्यंत वन्यजीव संवर्धन प्रतिष्ठानला दहा पट्टेरी वाघ, 46 बिबटे आणि रानकुत्र्यांचे नऊ कळप कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळलेले आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बाहेर महाराष्ट्रातले जे समृद्ध वनक्षेत्र अस्तित्वात होते, त्याला सरकारने संवर्धन क्षेत्राचा दर्जा प्रदान केलेला आहे आणि हे क्षेत्र गोव्यातल्या म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकातल्या भीमगड अभयारण्याशी संलग्न आहे. त्यात खरंतर पूर्वापार पट्टेरी वाघांचा अधिवास समृद्ध जंगल क्षेत्रात अधिवास होता, त्यासंदर्भात कॅमेरा ट्रॅपच्या तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करण्याचे कार्य प्राणीशास्त्रज्ञ गिरीष पंजाबी आणि वन्यजीव अभ्यासक त्याचप्रमाणे कोल्हापूर वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केलेले आहे.
डॉ. अनिश अंधेरा यांच्या अध्यक्षतेखाली जी वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट (वन्यजीव संवर्धन प्रतिष्ठान) कार्यरत आहे, त्यांनी जो हल्लीच आपला अहवाल प्रकाशित केलेला आहे, त्याद्वारे सह्याद्री ते काळी व्याघ्र भ्रमणमार्गात महाराष्ट्राच्या पट्ट्यात आठ प्रौढ आणि दोन बछडे कॅमेराने टिपलेले आहेत. या अहवालाने महाराष्ट्रातल्या वन संवर्धन क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न वनात पट्टेरी वाघ आणि बिबट्यांबरोबर गवेरेडे आणि सांबराची असलेली घनता अधोरेखित केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील एकेकाळी समृद्ध असलेले आणि वन्यजीवांचा अधिवास असलेले वनक्षेत्र शेती, बागायती, लोकवस्ती यांच्या विस्ताराबरोबर जे नवनवीन विकास प्रकल्प आणलेले आहेत, त्यामुळे झपाट्याने कमी होऊन वन्यजीवांचे अस्तित्व संकटग्रस्त होत आहे. त्यामुळे वन्यजीवन अणि मानव यांच्यातला संघर्ष विकोपाला पोहोचलेला आहे. कर्नाटकातल्या दांडेलीच्या जंगलातून स्थलांतरीत झालेल्या हत्तीच्या कळपाचा आणि तिळारी-माणगाव खोऱ्यातल्या स्थानिक शेतकरी-बागायतदार यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. केरळातील वायनाडच्या प्राणघातक भूस्खलनाच्या संकटापाठोपाठ केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्राचा मसूदा प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे सधन वनक्षेत्राच्या अस्तित्वाचा आणि त्याभोवती अत्यावश्यक असणाऱ्या पर्यावरणीय संवेदन क्षेत्राचाही मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे.
वाघांच्या भ्रमणमार्गाच्या अहवालाने सस्तन वन्यजीवांसमोर वन संवर्धन क्षेत्रातून जाणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाबरोबर अन्य जी संकटांची मालिका निर्माण झालेली आहे, तिला अधोरेखित केलेले आहे. या महामार्गाच्या अस्तित्वामुळे आणि प्रस्तावित विस्तारामुळे वन्यजीवांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणती उपाययोजना आवश्यक आहे, त्याबाबतचा ऊहापोह सदर अहवालात करण्यात आलेला आहे. सह्याद्रीने काळी व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेल्या भ्रमणमार्गाच्या आधारे जंगली श्वापदांनी एका जंगलातून दुसरीकडे स्थलांतरीत होण्याबरोबर सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात त्यांचे वास्तव्य पुन:प्रस्थापित करण्यासाठी त्याची भूमिका प्रधान वनपाल आर. एम. रामानुजन यांनी अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे सह्याद्री आणि काळीला जोडणारा जो व्याघ्र भ्रमण मार्ग अस्तित्वात आहे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण होणे पट्टेरी वाघ आणि बिबटे, अस्वले आणि अन्य मोठ्या जंगली सस्तन प्राण्याच्या पैदासीला पूरक असल्याचे वन्यजीव संशोधक आणि वन्यजीव व्यवस्थापकांचे मत आहे. कर्नाटकातल्या अणशी-दांडेलीच्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्रातून चांदोली आणि कोयनाच्या सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात पट्टेरी वाघ भ्रमंती करीत असल्याचे कॅमेरा ट्रॅपद्वारे यापूर्वीच स्पष्ट झालेले आहे.
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडच्या कर्नाटक राज्यातल्या जोयडा तालुक्यात येणाऱ्या काळी व्याघ्र प्रकल्पापर्यंत 10 हजार 785 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात झालेला आहे. या भ्रमणाच्या मार्गात संरक्षित वनक्षेत्राबरोबरच खासगी, सरकारी मालकीचे वनक्षेत्र, लोकवस्तीयुक्त गावे, महामार्ग, रेल्वेमार्ग, जलसिंचन प्रकल्पांतर्गत उभारलेली धरणे, पाटबंधारे आदी गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्यामुळे वाघ आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अनेक ठिकाणी दुरावा आणि अडथळे निर्माण झालेले आहेत. यापूर्वी 2022 साली करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेद्वारे कर्नाटकातल्या गोवा-महाराष्ट्राशी संलग्न जंगलांत 17 आणि गोव्यात पाच वाघांची नोंद झालेली आहे. वन्यजीव संवर्धन प्रतिष्ठानच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दहा वाघांच्या छायाचित्रांची नोंद झालेली असून त्यात सह्याद्री व्याघ्रक्षेत्र अथवा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यासारख्या वनांतल्या वाघांच्या संख्येचा समावेश करण्यात आलेला नाही. सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाच्या वनक्षेत्रातल्या तिळारी धरणाच्या जलाशयासारख्या प्रदेशात मादी वाघ प्रजनन करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
2015 साली येथे जन्मास आलेल्या वाघिणीने तीन पिल्लांना जन्म दिला होता. मे 2018 मध्ये सह्याद्री व्याघ्र क्षेत्रातल्या चांदोली अभयारण्यातला नर वाघ काळी व्याघ्र क्षेत्रात मे 2020 साली आढळलेला होता तर 2018 मध्ये महाराष्ट्रातल्या तिळारी खोऱ्यात कॅमेरा ट्रॅप झालेली वाघीण जवळपास चार वर्षांनंतर 30 जून 2021 रोजी गोव्यातल्या म्हादई अभयारण्यात आढळली होती. कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञान आणि वन्यजीव संशोधकांच्या अभ्यासातून सह्याद्री ते काळी व्याघ्र क्षेत्रातला भ्रमणमार्ग पट्टेरी वाघांबरोबर अन्य मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी महत्त्वाचा असल्याचे वेळोवेळी उघडकीस आलेले आहे. त्यामुळेच व्याघ्र भ्रमणमार्गाच्या वनक्षेत्राला सर्वोच्च स्तराचे संरक्षण लाभणे हे इथल्या वास्तव्यास असणाऱ्या लोकांच्या पेयजल, सिंचन, प्राणवायू, अन्न-धान्यांच्या पैदासीसाठी पूरक आणि पोषक आहे, याची आम्ही जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे.
- राजेंद्र पां. केरकर