For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्गुण काय आहे हे समजून घेऊन सगुणभक्ती करावी

06:41 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
निर्गुण काय आहे हे समजून घेऊन सगुणभक्ती करावी
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, जन्मापासूनच ज्ञानघन असलेल्या श्रीकृष्णाचे चरित्र अतिपावन आहे. त्याच्या संगतीत राहून गवळ्याच्या अज्ञानी पोरांचा उद्धार झाला. त्याच्यावर प्रेम करून कित्येक गवळणी उद्धरून गेल्या. सुंदरशी कृष्णमूर्ती पाहून गायीसुद्धा तिथल्या तिथे तटस्थ होत होत्या. जनावरांचासुद्धा कृष्णाच्या सोबत राहून त्याच्या संगतीमुळे उद्धार झाला. कृष्ण एव्हढा ज्ञानघन होता की, त्याच्या संगतीने वृन्दावनातल्या गवताच्या पात्यांचा, रोपांचा, झाडांचाही उद्धार झाला.

त्याच्या संगतीत जे होते त्यांचा तर उद्धार झालाच पण ज्यांनी त्याच्याशी वैर पत्करले त्यांचाही त्याने उद्धार केला. कृष्णाचे अनेक वैरी सतत त्याचे चिंतन करत कृष्णरूप झाले आणि त्यातूनच त्या सर्वांचा उद्धार झाला. श्रीकृष्णाने तारू होऊन भवसागरातून किती जडमूढ मंडळींचा उद्धार केला त्याला काही गणतीच नाही. त्याने मोक्षाचा उघड उघड सुकाळ केला. त्याला लहानपणी ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवला, तो खेळता खेळता तहान लागली म्हणून ज्यांच्या घरी पाणी प्यायला, ज्यांचे लोणी त्याने चोरून खाल्ले त्या सगळ्या सगळ्यांचा त्याने उद्धार केला.

Advertisement

ज्यांचे ज्यांचे त्याच्याशी नाते जुळले, जे जे त्याला कौतुकाने पहायला आले त्या सगळ्यांच्याकडे एक एक नेत्रकटाक्ष टाकून त्याने त्यांचा उद्धार केला. त्याने पांडवांची उघड उघड बाजू घेतली तर वैऱ्याना शस्त्राने मारले पण त्याच्या संगतीत जे जे आले, मग ते शत्रू असोत वा मित्र त्या सगळ्यांचा त्याने कोणताही भेदभाव न ठेवता उद्धार केला. वैऱ्यांनी त्याचा अखंड द्वेष केला आणि भक्तांनी त्याचे अखंड भजन केले. दोघांच्यात समान गोष्ट अशी होती की, वैरी असोत वा भक्त, दोघेही त्याचे अखंड चिंतन करत असायचे. त्यामुळे त्याला त्या दोघांचाही उद्धार करावा लागला कारण ते त्याचे ब्रीदच होते. जो कोणी त्याचे अखंड चिंतन करेल त्याचा उद्धार हा होणारच. ह्या न्यायाने वैरी आणि भक्त ह्या दोघांचाही त्याने उद्धार केला. गोपींची तऱ्हा वेगळी होती. त्यांना श्रीकृष्णाच्या उपस्थितीची भुरळ पडली होती. तो जेथे जेथे जात असे तेथे तेथे त्याच्यापाठीमागे त्या जात असत कारण त्याच्या बरोबर जाण्यात, त्याच्या संगतीत राहण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळत असे. त्यांनी त्याच्या अखंड केलेल्या संगतीने त्यांचा उद्धार झाला.

त्याविषयी एक कथा अशी सांगतात की, उद्धवाला भगवंतांनी आत्मज्ञान देत असताना आत्मा सत्य असून देह मिथ्या आहे हे त्याच्याकडून त्यांनी वदवून घेतले. त्याला पूर्ण आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर उद्धवाला भगवंत म्हणाले की, आता हेच ज्ञान वृन्दावनातल्या गोपीना जाऊन सांग. त्याप्रमाणे तो वृंदावनात गोपीना भेटून म्हणाला, तुम्ही श्रीकृष्णाच्या देहावर प्रेम करता, त्याच्या देहाने उपस्थित राहण्यावर भाळता परंतु देह हा मिथ्या आहे तो आज ना उद्या जावयाचा आहे म्हणून तुम्ही त्याच्या देहावर प्रेम न करता त्याच्या आत्म्यावर प्रेम करा. गोपीनी त्याचे आत्मज्ञानाचे बोल ऐकून घेतले आणि त्या म्हणाल्या, हे ज्ञान जिथे कोणी नाही तेथे जाऊन सांग कारण श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जो आनंद मिळाला तो तुला समजणार नाही.

ह्याचे कारण असे होते की, गोपीनी स्वत:च्या देहाचे भान विसरून श्रीकृष्णाच्या देहावर प्रेम केले होते. जो स्वत:ला विसरून देवावर प्रेम करतो तो स्वत:ची सध्याची अवस्था विसरून देवरूप होतो. त्या स्थितीतून तो पुन्हा देहावस्थेत येऊ शकत नाही. अशा देवरूप झालेल्या गोपींचा उद्धार केवळ त्यांनी श्रीकृष्णाच्या देहावर प्रेम केल्याने झाला. म्हणून श्री गोंदवलेकर महाराज सांगतात, निर्गुण काय आहे हे समजून घेऊन सगुणभक्ती करावी. सगुणभक्तीचे महात्म्य स्वत:च्या वर्तणुकीतून गोपीनी सर्व जगाला पटवून दिले.

क्रमश:

Advertisement
Tags :

.