Sagali News : 'या' गावात पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा ; ग्रामस्थांमधून संताप
पुलाअभावी पाण्यातून अंत्ययात्रा स्मशानभूमीत जाण्यासाठी पार करावा लागतो ओढा
पेड : तासगाव तालुक्यातील पेड येथील ग्रामस्थांना अंत्ययात्रा पाण्यातून काढावी लागते. पेड येथील वाणी मळा ते अन्य भागातील लोकांना मोठी समस्या भेडसावत आहे. या रस्त्यावरून कापूर ओढ्याचे पाणी जात असते. या अगोदर पाण्यात जनावरे, वृद्ध यांचा जीव जाऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
अनेकदा महिला, विद्यार्थी वाहून जाताना यांचा जीव वाचला आहे. पण अंत्ययात्रा सुखाची होऊ नये अशी लोकप्रतिनिधींची भावना आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. पेडपासून चार कि.मी. अंतरावर वाणेमळा आहे. दोन दिवसांपूर्वी या मळ्यातील वृद्ध व्यक्ती वाहून गेली होती. या भागात लोकवस्ती असल्यामुळे या भागातून पेडकडे
याच कापूर ओढ्यातील पाण्यातून यावे लागते. पाण्यातून कसरत करीत महिला, पुरुष व विद्यार्थी यांना ये जा करावी लागते. वाणेमळेतील लोकांची मोठी रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे.
पाणी आले की या भागाचा व गावाचा संपर्क तुटतो आतापर्यंत बंधाऱ्यावरून पाणी वाहून जात आहे व रस्ता बंद होत आहे. पावसाळ्यात चालू वर्षी मुसळधार पावसामुळे सलग सात वेळा कापूर ओढ्याला पूर आला.
याच कापूर ओढ्यावर धोंडेवाडी, नरसिंहपूर, हजार वाडी, मोराळे, येथील पूल पाण्याखाली गेले होते. या पूर्वी शासकीय पातळीवर व आमदारांच्या माध्यमातून पाहणी करुन सर्वे केला असून त्याची पूर्तता होऊ शकली नाही, अशी खंत पेड व परिसरातून व्यक्त केली जात आहे.
तरी याकडे विसापूर सर्कलमधील व तासगाव, कवठेमहांकाळ मतदार संघातील लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून ओढ्यावर पूल करावा अशा प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त केल्या जात आहेत.