For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

केशर की हापूस? तुम्हीच ठरवा!

06:41 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
केशर की हापूस  तुम्हीच ठरवा

आंब्याचा मौसम सुरू झाला आहे. वेगवेगळ्या वेळी बाजारात दाखल होणारे वेगवेगळे आंबे आता एकदम येण्याचे दिवस आले आहेत. राज्यातील सर्व मोठ्या बाजार पेठांमध्ये एकाच वेळी हापूस आणि केशर दोन्ही आंबे दाखल झाले आहेत. दोन प्रकारचे आंबे आणि दोन प्रकारच्या चवी. हापुसची चव वेगळी आणि केशरची वेगळी! ज्याला जो लाभला, त्याला त्याची गोडी! वाहतुकीची साधने खूप झाली आणि त्यामुळे हापूस अलीकडे मौसमाच्या सुरुवातीला सुद्धा राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळू लागला. अगदी देवगड, रत्नागिरी हापूस या नावाखाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील तसेच राज्याच्या विविध भागातील आंबा हापूस म्हणून खपवण्याचा उद्योगही जोरात सुरू झाला. त्यापूर्वी हापूस म्हणजे ज्याला परवडेल त्याच्या दारात मिळणारा महागडा आंबा. फळांचा राजा आंबा आणि आंब्यात राजेपण हापूसचे! समुद्र किनाऱ्यावरील दमट वातावरणात विशिष्ट प्रदेशात तयार होणारा हा हापूस! त्याची चव इतरांहून वेगळी आणि नाव तर जगभर! जसे नाव तसाच भाव. त्यामुळे आजही हापूस जगभर भाव खाऊन जातो. केशरचे तसे नव्हते. त्याचे अस्तित्व कोकणऐवजी महाराष्ट्रातील आणि देशातील इतर भागात मोठ्या प्रमाणावर. त्याची उपस्थितीसुद्धा उशिराची आणि त्याच्या विशिष्ट चवीची भुरळसुद्धा फार मोठ्या वर्गाला पडलेली असायची. कारण, सर्वसाधारण माणसांना परवडणारा, त्यांच्या अवाक्यातला असा हा आंबा. त्यामुळे एकाला असलेली राजमान्यता आणि एकाला असलेली सर्वमान्यता यामुळे दोघांचेही महत्त्व त्या त्या भागात टिकून आहे. आता काळ बदलला. जीआय मानांकनाने आंबा कुठला, कसा ओळखायचा याचे एक तंत्र विकसित झाले आणि लोकांना खराखुरा हापूस कसा असतो याचा बऱ्यापैकी अंदाज आला. या हापूसला त्याच्या नावलौकिकाप्रमाणेच भाव मिळू लागला. मात्र वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करायची आणि मौसमानंतर सुद्धा आंबा खायला उपलब्ध असला पाहिजे या गरजेतून केशरला सुद्धा महत्त्व निर्माण होऊ लागले. आधुनिक काळात वेगवेगळ्या प्रकारच्या चवी निर्माण करणाऱ्या इसेन्सने बाजारात इतका धुमाकूळ घातला की डबेबंद पल्प इतर आंब्याचा आणि त्याला सुगंध हापूसचा येऊ लागला. त्यामुळेच मौसम सुरू असेपर्यंत आणि मूळचा हापूस आणि परराज्यातून आणलेला आणि खूप मोठ्या लोकसंख्येला गंडा घालून गळ्यात घातला जाणारा खोटा हापूससुद्धा तेवढाच भाव खाऊ लागला. लोकांची फसवणूक होत असली तरी आपण हापूस खाल्ला या आनंदात लोक त्याकडे दुर्लक्ष करू लागलेले दिसतात. हे चांगल्या आणि सिंथेटिक दुधात फरक न करता आल्याने होणाऱ्या फसवणुकीसारखेच! गतवर्षी तर कोकणात सुद्धा काही लोकांनी कोकणचा हापूस म्हणून परराज्यातील हापूस कोकणात विकण्याचे उद्योग करून पाहिले. जागृत शेतकऱ्यांनी अशा दुकानांवर धावे बोलून त्यांना विक्री थांबवण्यास भाग पाडले. महाराष्ट्रातील कोकण सोडूनच्या ग्रामीण भागात केशर आंबा आवडीने खाल्ला जातो. त्याचे कारण तो या प्रांतात सहज उपलब्ध असणारा आहे. हापुसची जशी स्वत:ची जगाला भुरळ पाडणारी चव आहे तशीच केशरचीसुद्धा स्वत:ची अशी चव आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात या चवीचा चाहताही मोठा आहे. मात्र तरीसुद्धा प्रत्येक भागातील माणसाला हापूस आपणही खावा असे वाटते. त्या आसेपोटी लोक फसवणूकसुद्धा सहन करतात. इतक्या मोठ्या संख्येने मागणी असली तरी तितका हापूस आंबा कोकणात पिकत नाही. संपूर्ण जगात त्याला मागणी असल्यामुळे जिथे चांगला दर मिळेल तिथे आंबा मोठ्या प्रमाणावर जातो. मग राहिलेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम इतर आंबे करतात. हापूस आंब्याच्या डेरेदार झाडांमुळे त्या आंब्याची घनता कमी आहे. महाराष्ट्रात आणि देशातील विविध भागात केशरची लागवड होते आणि एका एकरात सातशे ते हजार झाडेसुद्धा लावली जातात. त्याला लागणारे आंबेही तसेच मुबलक. त्यामुळे हापूसला उच्च दर मिळत असला तरी केशरला उत्पादन जास्त असल्याने अधिकचा आंबा कमी दराने का होईना मात्र उत्पादकाला पैसा मिळवून देऊन जातो. आंब्याची गरज बाजारपेठेला मोठ्या प्रमाणावर आहे. पल्प, शीतपेये त्यांच्या माध्यमातून देशातील खूप मोठ्या लोकसंख्येला वर्षभर आंब्याची चव आवश्यक वाटते आणि त्यावेळी केशरसारखे आंबे या व्यवसायाला उपयुक्त ठरतात. त्याची मोठ्या प्रमाणावर या कंपन्या खरेदी करतात. केशर आंब्याची लागवड वाढत आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात प्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत. प्रदेशनिहाय महत्त्व निर्माण झालेल्या या आंब्यांशिवायही देशाच्या इतर भागातील आंब्याने आपले महत्त्व महाराष्ट्रात निर्माण केले आहे. त्यांचाही खप त्याच्या खालोखाल आहे. हे आंबे तिथल्या शेतकऱ्याला फारसा फायदा मिळवून देत नाहीत. मात्र त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला चांगला पैसा मिळतो आणि लोकांना डुप्लिकेट हापूस खायला मिळतो. फसवणूक होते पण ती लोक आणि सरकारही क्षम्य ठरवते. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कोणीतरी, कोणत्यातरी मार्गाने पूर्ण करतो ना? आणि लोकांची फारशी तक्रार नसेल तर त्यांना शहाणे करायला कशाला जा? अशा उदार भावनेने यंत्रणा या फसवणुकीकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक हे दुर्लक्ष होता कामा नये. ज्याला त्याला, त्याचा भाव मिळावा. पण, सर्वसामान्यांची फसवणूक करून खोटा माल गळ्यात घालण्याचा उद्योग सहन करायचा नाही. गेल्या काही पंचवार्षिकांमध्ये आंब्याचा मौसम आणि निवडणुकीचा मौसम एकच ठरतो आहे. निवडणुकांमध्ये हापूस की केशर असा पर्याय मतदारासमोर असतो. मतदार जागृत असेल त्या भागात अस्सल हापूस आणि अस्सल केशरप्रमाणे अस्सल उमेदवार निवडला जातो. जिथे लोक डळमळीत असतात, जिथे तात्कालीक बुद्धीभेदाला ते बळी पडतात तिथे बऱ्याच वेळा डुप्लिकेट भाव खातो. देशामध्ये कोण खरा आणि कोण खोटा असे ठरवण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. एखादी यंत्रणा तसे सांगू लागली तर ती सुद्धा फसवणूकच आहे. तुमची निवड हापूस असेल तर खरा हापूस मिळाला पाहिजे आणि जर केशर असेल तर त्या केशरची चव मिळाली पाहिजे. चांगल्याची घनता कमी असते असे नाही. केशर असो हापूस असो की अन्य कुठला. प्रत्येकात चांगल्या चवीचे, दमदार आंबे उपलब्ध असतात. निवड करणाऱ्याने त्यासाठी जागृत असावे लागते. पुन्हा तो लागट होता म्हणून तक्रार करता येत नाही. राजकारणात अशा उमेदवारांना परत बोलवण्याची तरतूद असली तरी लोकांचे त्यावर एकमत होऊ शकत नाही. परिणामी निवड करतानाच योग्य विचार करणे आवश्यक असते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.