1 नोव्हेंबर राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर हटविल्या शहरातील भगव्या पताका
बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त 1 नोव्हेंबर रोजी शहरात मिरवणूक काढली जाते. या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेकडून शहरातील विविध गल्ल्यांमध्ये लावण्यात आलेल्या भगव्या पताका काढल्या जात आहेत. दिवाळीनिमित्त खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, काकतीवेस आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत भगव्या पताका लावल्या होत्या. मात्र, राज्योत्सव मिरवणुकीचे कारण पुढे करत मिरवणूक मार्गावरील पताका हटविल्या जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी बेळगावात मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो. विविध गल्ल्यांमध्ये आकर्षक रोषणाई केली जाते. त्याचबरोबर व्यापारी स्वखर्चातून वर्गणी गोळा करून भगव्या पताका लावत आहेत. त्याचप्रमाणे यंदादेखील विविध ठिकाणी भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. दिवाळी संपून केवळ चार दिवस उलटले आहेत.
मात्र, महापालिकेला सदर भगव्या पताकांची कावीळ झाल्याचे दिसून येत आहे. ज्या मार्गावरून राज्योत्सव मिरवणूक काढली जाते, त्या मार्गावरील पताका काढण्याचे काम दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही महापालिकेकडून गणपत गल्लीसह विविध ठिकाणच्या भगव्या पताका हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पताका हटविताना विरोध होईल, या शक्यतेने पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला होता. भगव्या पताका काढण्यासह लावण्यात आलेले मोठमोठे आकाशकंदील देखील हटविण्यात आले. राज्योत्सव मिरवणुकीत लालपिवळ्या रंगाचा ध्वज मिरवण्यासह डीजेच्या आवाजावर धिंगाणा घातला जातो. यावेळी भगव्या पताकांवरून पेचप्रसंग निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महापालिकेकडून शहरातील भगव्या पताका हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.