बंडीपूर, नागरहोळे येथील सफारी बंद
बेंगळूर : म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात अलीकडे मानव-वन्यप्राणी संघर्षांच्या घटनांत वाढ झाली आहे.शुक्रवारी म्हैसूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांत वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला आहे. याची वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. बंडीपूर व नागरहोळे अभयारण्यातील सफारी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांना मंत्री ईश्वर खंड्रे यांनी शुक्रवारी पत्र पाठवून ही सूचना दिली. वाघाला पकडण्यासाठी शोधमोहीम राबविण्याची सूचना वनमंत्र्यांनी दिली. म्हैसूर, चामराजनगर जिल्ह्यातील बंडीपूर व नागरहोळे अभयारण्यालगत असलेल्या गावांत वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे दोन्ही अभयारण्यातील सफारी पुढील आदेशापर्यंत बंद करा, असे निर्देश दिले आहेत.