शिरूर दुर्घटनेतील स्थानिकांना वाचविण्यात दुजाभाव
अंकोला तालुक्यातील नेते राजेंद्र नाईक यांचा आरोप
कारवार : अंकोला तालुक्यातील शिरूर येथील दुर्घटनेनंतर केरळमधील लॉरी आणि लॉरी चालकाचा शोध घेण्यासाठी कारवार जिल्हा प्रशासनाने दाखविलेले गांभीर्य आणि काळजी बेपत्ता झालेल्या त्या दोन स्थानिक व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दाखवलेले नाही, असा आरोप अंकोला तालुक्यातील आर्य इडींग नामधारी संघाचे नेते राजेंद्र नाईक यांनी केला आहे. ते येथे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, 16 जुलै रोजी अंकोला तालुक्यातील शिरूर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर दरड कोसळून 18 जण बेपत्ता झाले होते. यापैकी आठ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
आठ पैकी केरळमधील लॉरीचालक अर्जुन याचा शोध घेण्यासाठी राजकीय दबावापोटी किंवा अन्य कारणामुळे मोठी मोहीम राबविली. अर्जुनचा आणि त्याच्या लॉरीचा शोध घेण्यासाठी गोव्याहून ड्रेजिंग यंत्रणा पाचारण करण्यात आली होती. अर्जुनचा मृतदेह हाती लागताच शोध मोहीम स्थगित करण्यात आली. त्यामुळे 16 जुलैपासून बेपत्ता झालेल्या स्थानिक जगन्नाथ नाईक आणि लोकेश नाईक यांचे काय झाले? कळायला मार्ग नाही. जगन्नाथ आणि लोकेश यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. जगन्नाथ आणि लोकेश यांचा शोध लावण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे,
असा आरोप करून राजेंद्र नाईक पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने एकप्रकारे स्थानिकांच्या बाबतीत भेदभाव केला आहे. अर्जुनचा मृतदेह हाती लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ड्रेजिंग यंत्रणेद्वारे आणखी काही दिवस शोध मोहीम सुरू ठेवायला हवी होती. असे स्पष्ट करून नाईक पुढे म्हणाले, तसे झाले असते तर जगन्नाथ आणि लोकेश यांचेही मृतदेह हाती लागले असते. हिंदू धर्मानुसार जोपर्यंत मृतदेह हाती लागत नाही. आणि पुढील विधी पार पाडल्या जात नाहीत. तोपर्यंत त्या व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. शिरूर दुर्घटनेनंतर गंगावळी नदीत कोसळलेले मातीचे ढिगारे हटविले गेले पाहिजेत. अन्यथा पावसाळ्यात गंगावळी नदी प्रदेशात मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिकांचा शोध लावा अन्यथा तीव्र आंदोलन
आर्य इडींग नामधारी संघाचे अध्यक्ष नागेश नाईक बोलताना म्हणाले, जिल्हा प्रशासनाने गंगावळी नदीतील स्थगित केलेली शोध मोहीम पुन्हा सुरू करावी आणि जगन्नाथ नाईक व लोकेश नाईक यांचा शोध लावावा. अन्यथा स्थानिक जनतेच्या मदतीने सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी दामोदर नाईक, गजू नाईक, श्रीपाद नाईक, श्रीधर नाईक, विजय नाईक आदी उपस्थित होते.