For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐन गणेशोत्सवात साळ गावावर कोसळले दु:ख..!

12:28 PM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऐन गणेशोत्सवात साळ गावावर कोसळले दु ख
Advertisement

राऊत कुटुंबीयांचे राहिले 31 गणपती : परबांना पोहोचवाव्या लागल्या 41 गणेशमूर्ती

Advertisement

वार्ताहर/लाटंबार्से

श्रीगणेशचतुर्थी हा सण म्हणजे हिंदू समाजासाठी आनंदाची महापर्वणी असते. श्रावण लागला की सर्वांनाच गणपतीचे वेध लागतात. छोट्यांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच हा उत्सव हवाहवासा वाटतो. सारेजण गणेशचतुर्थीत उत्साहाने सहभागी होतात. गणपती बाप्पाच्या आगमनाने सारेजण भक्तीत तल्लीन झालेले असतात. अशावेळी एखाद्या घरात कुणाचे निधन झाल्यास काय प्रसंग ओढवेल त्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर? हे शब्दांत सांगताच येणार नाही. डिचोली तालुक्यातील साळ गावात अशाच दोन ह्य्दयद्रावक घटना घडल्या.

Advertisement

गणेशचतुर्थीच्या दोन दिवस अगोदर साळ गावातील मधलावाडा येथील सरस्वती जयदेव राऊत (75 वर्षे) या आजारी असलेल्या महिलेचे दु:खद निधन झाले. वाड्यावर शोककळा पसरली. गणपती बाप्पाची वाट पाहत, त्याच्या आगमनाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेले असतानाच राऊत कुटुंबीयांवर हे दु:ख कोसळले. सारे काही होत्याचे नव्हते झाले. तरीही राऊत कुटुंब स्वत:ला सावरत मोठ्या धैर्याने, मानवीय अंत:करणाने या दु:खाला सामोरे गेले. शोकसागरात बुडालेल्या राऊत कुटुंबीयांच्या 31 गणपतींचे पूजन झाले नाही.

गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी खालचा वाडा येथील सौ. मिलन भिवा (आपा) परब (52 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. ध्यानीमनी नसताना सारे कुटुंब शोकसागरात बुडाले. क्षणात सारे वातावरण पालटून गेले. त्यामुळे परब कुटुंबीयांचे 41 गणपती उत्तरपूजा न करता पोहोचवावे लागले.  त्यादिवशी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सौ. मिलन यांना त्रास जाणवू लागला होता. कुटुंबीयांनी 108 ला फोन केला असता कासारपाल किंवा डिचोली येथे उपलब्ध असणारी 108 अॅम्ब्युलन्स मिळू शकली नाही. तरीही सांखळी येथील 108 अॅम्ब्युलन्स आली, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. सौ. मिलन यांची प्राणज्योत मालवली होती.

परब कुटुंबीयांच्या निवासस्थानी पुजलेल्या 41 गणपतींची उत्तरपूजा न करता ते पोहोचवावे लागले. अत्यंत शोकाकुल वातावरणात दुसऱ्या कुटुंबातील लोकांच्या हस्ते या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पती, सासू ,दोन विवाहित दीर, जाऊ, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.