For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हे विवेचन सद्गुरुंनी माझं नाव पुढे करून स्वत: केले

06:10 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
हे विवेचन सद्गुरुंनी माझं नाव पुढे करून स्वत  केले
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणतात, भगवद्भजन सगळ्यात श्रेष्ठ असून ते करणाऱ्या भक्तांच्या ऋणात श्रीकृष्ण असतो. त्याला भक्तांच्या प्रेमाचे ओझे होते आणि ते अंशत: फेडावे म्हणून तो त्यांच्या अधीन होतो. भक्तांवर त्याचे अतोनात प्रेम असते. त्यांची खुण म्हणजे निजधामाला जाताना त्याला इतर कुणाचीही आठवण न होता श्रेष्ठ भक्त विदुराची आठवण झाली. ती सुद्धा का, तर त्याला आत्मज्ञान द्यायचे राहिले म्हणून. शेवटी त्यासाठी मैत्रेयाला त्याने आत्मज्ञान देऊ केले आणि त्याला विदुरांना उपदेश करण्याची आज्ञा केली.

भक्तांच्या जे जे मनात असते ते ते तो पुरवतो. भक्तावर तो करत असलेल्या कृपेला कोणतीही सीमा नसते. ह्याचा पुरावा म्हणजे शेवटी तो त्यांना स्वत:चे पदही देऊ करतो. आता उद्धवाचंच पहा ना, तो निजधामाला निघाला असताना उद्धवाने त्याला कोणताही प्रश्न विचारला नव्हता तरीही हे परमामृताचे कथन त्याने केले. त्याने उद्धवावर केलेल्या ह्या कृपेमुळे उद्धवाचा जगावर महाथोर उपकार झाला आहे. त्याच्यामुळे श्रीकृष्णांनी स्वत: सांगितलेले भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे सार गुह्यज्ञानाच्या स्वरुपात लोकांच्या आयतेच पदरात पडले. आत्तापर्यंत हा ज्ञानाचा खजिना भगवंतांनी त्यांच्या हृदयात अगदी गुप्त ठेवला होता. उद्धवाला सांगण्याच्या निमित्ताने भगवंतांनी तो सर्वांसाठी खुला केला.

Advertisement

भगवंतांच्याकडून मिळालेल्या गुह्यज्ञानाच्या उपदेशाने आणि त्यानुसार केलेल्या भजनाने उद्धवाचा तर उद्धार झालाच पण त्याचबरोबर सर्व त्रिभुवनाचीसुद्धा भवसागर तरुन जाण्याची तयारी झाली. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही मुक्ती भगवंतांनी उद्धवाला बहाल केल्या होत्या पण त्यापेक्षा उद्धवाला भगवद्भक्ती जास्त प्रिय असल्याने त्याने भगवंतांनी दिलेल्या चारही मुक्तींची उपेक्षा केली. जो ह्याप्रमाणे चारही मुक्तींच्याकडे दुर्लक्ष करून हरीभजन करतो त्याला भगवंतांपेक्षा जास्त ताकद प्राप्त होते. उद्धवाच्या बाबतीत हेच घडल्याने त्याच्यामध्ये तिन्ही जगताचा उद्धार करण्याची शक्ती प्राप्त झाली. त्यामुळे उद्धवाची ख्याती वाढली. ह्या एकादश स्कंधात उद्धवाच्या निमित्ताने भगवंतांनी भक्ती करून मुक्ती कशी मिळवता येते ह्याचे समग्र ज्ञानच भक्तांसाठी खुले केले. ह्यानुसार वागल्याने अनेक जड जीवांचा उद्धार झाला. ज्याप्रमाणे गायीच्या ठायी असलेल्या दुधाचा साठा गायीला वासराने तोंड लावल्यावर खुला होतो त्याप्रमाणे भगवंतांनी स्वत:हून उद्धवासाठी आत्मज्ञान प्रकट केले. पुढं नाथमहाराज एकादश स्कंधाचे निरुपण करण्यामागची त्यांची भूमिका सांगताना म्हणतात, खरं म्हणजे श्रीकृष्ण आणि उद्धव ह्यातील संवाद हा अत्यंत गहन आहे. त्यापुढे मी अगदीच दिन आहे. तरीही त्याचे वर्णन करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य माझे सर्वज्ञ सर्वार्थीं असलेले सदगुरु श्री जनार्दनस्वामींनी केले. ज्ञानाची परिपाकस्थिती, वैराग्ययुक्त भक्तिमुक्ती ह्यातलं मला काहीही माहित नाही. तेव्हा माझ्या रूपाने श्री जनार्दन स्वामींनीच हे निरूपण केले आहे. माझे नामरूप, कर्म, गुण हे बघितले तर मिथ्या आहेत पण माझ्या प्रेमापोटी स्वामींनी त्याचाही स्वीकार केला. हे एकत्व जोपर्यंत हाताला लागत नाही तोपर्यंत देवाची प्रसन्नता लाभत नाही आणि त्यामुळे आपण कर्ते नाही हे लक्षात येत नाही. माणसाला जोपर्यंत मी कर्ता आहे असा अहंभाव वाटत असतो तोपर्यंत देवाची गाठ पडत नाही. अहंतेमुळे मनुष्य बद्ध होतो आणि मुक्तता त्यापासून दूर जाते. ज्याप्रमाणे बाहुल्यांच्या खेळात त्यांचे रुसणे आणि आनंदित होणे हे बाहुल्यांच्या हातात नसून त्यांना खेळवणाऱ्याच्या मनावर अवलंबून असते. त्याप्रमाणे मला खेळवणाऱ्या स्वामींनी ह्या एकादश स्कंधाचे विवेचन माझ्या नावाने करून टाकले. त्यामुळे हे विवेचन साधुसंतांच्या आवडीचे झाले.

अध्याय एकोणतिसावा समाप्त

Advertisement
Tags :

.