For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धवाला सद्गुरुभक्ती परमप्रिय होती

06:02 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
उद्धवाला सद्गुरुभक्ती परमप्रिय होती
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

यादव कुळाला मिळालेल्या ब्राह्मणांच्या शापापासून वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनीच उद्धवाला त्यांच्यापासून लांब बद्रिकाश्रमात जायला सांगितले. परिस्थिती अशी होती की, उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून झालेला असल्याने ते आता निजधामाला जाणार होते. त्यामुळे एकदा उद्धव द्वारकेतून निघाला की, पुन्हा त्याची आणि श्रीकृष्णनाथांची भेट होणार नव्हती. श्रीकृष्णांच्या आज्ञेने उद्धवावर दु:खाचा पहाड कोसळला परंतु तो श्रीकृष्णांची आज्ञा डावलू शकत नसल्याने तेथून निघताना त्याचे भगवंतांवरील प्रेम उफाळून आले. निघताना त्याने श्रीकृष्णाला अत्यंत प्रेमाने प्रदक्षिणा घातली. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रु घळाघळा वाहू लागले. त्या अश्रुंनी श्रीकृष्णाचे दोन्ही चरण भिजून गेले. श्रीकृष्णाबद्दल उद्धवाला वाटणारा स्नेह सुखदायक स्नेहाळू असल्याने त्यात स्वार्थाचा लवलेश नव्हता. उद्धवाच्या दृष्टीने गुरु आणि परब्रह्म दोन्ही एकच होते आणि उद्धवाने त्याची अनुभूती घेतली होती. समोर मनुष्य रुपात दिसणारा श्रीकृष्ण हेच परब्रह्म असून त्यांनी सगुण रुपात अवतार घेतला आहे ही भल्याभल्यांना न समजलेली गोष्ट त्याने ओळखली होती. श्रीकृष्णाचा कायम सुखाची अनुभूती देणारा स्नेह उद्धवाला अत्यावश्यक वाटत होता परंतु त्याच श्रीकृष्णाने त्याला दूर बद्रिकाश्रमात जायची आज्ञा केल्याने उद्धव दु:खाने व्हीवळत होता. ज्याप्रमाणे म्हातारपण आल्यामुळे पतिव्रतेची विषयातली गोडी जरी संपलेली असली तरी नवऱ्याच्या वियोगाची ती कल्पनाही करू शकत नाही. त्याप्रमाणे ज्यांच्या कृपेने त्याने परमार्थाचा अनुभव घेतला आणि त्यातूनच जीवन्मुक्तता अनुभवली त्या श्रीकृष्णांनी केलेला त्याचा त्याग तो सहन करू शकत नव्हता. त्यांच्यावरच्या प्रेमामुळे त्यांना सोडून जायच्या कल्पनेने उद्धव अतिविव्हळ झाला होता. अर्थात भगवंतांचीही अशीच स्थिती होती कारण लाडक्या भक्ताचा विरह त्यांनाही असह्य होत होता. उद्धवाला श्रीकृष्णाचे वैशिष्ट्या आठवले. त्यानुसार त्याच्यावर प्रेम करण्याच्या निमित्ताने, त्याचा द्वेष करण्याच्या निमित्ताने किंवा त्याच्याकडून काही मिळवण्याच्या इच्छेने जे जे त्याच्याजवळ गेले त्या त्या सर्वांना त्याने परमानंद दिला. अशा सर्वांना परमानंद मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाचा त्याग करायची कुणाला तरी इच्छा होईल का? जे लोक अधार्मिक कृत्ये करतात पण श्रीकृष्णाला भजतात ते इतके महत्त्वाचे होतात की, त्यांना ब्रह्मादिकसुद्धा वंदन करतात. उद्धव तर गुरुप्रेमापोटी स्वत:ला विकायलासुद्धा तयार होता मग तो श्रीकृष्णाचा त्याग करायला कसा तयार होईल? उद्धवाला गुरुभक्ती करायला मिळायची संधी परब्रह्म प्राप्तीच्या बरोबरीची वाटत होती. गुरुभक्तीच्या पुढे तो जीवनमुक्तीला गवताच्या काडीइतकीही किंमत द्यायला तयार नव्हता. त्यामुळे गुरुभक्तीपुढे भगवंतांनी देऊ केलेल्या मुक्तीची त्याने सहजी उपेक्षा केली. अनन्यतेने करायच्या गुरुभक्तीच्या पुढे त्याला कशाचीच किंमत नव्हती. सद्गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन कधीही न करणे हा सद्गुरू भक्तीचा महत्त्वाचा नियम असला तरी श्रीकृष्ण प्रेमाची संपूर्ण आवड असलेला उद्धव बद्रिकाश्रमात जायला सहजासहजी तयार होत नव्हता. एकीकडे श्रीकृष्णावरील प्रेमापोटी त्याच्या सहवासाची अत्यंत आवड तर दुसरीकडे सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन असा दुहेरी पेच उद्धवापुढे उभा ठाकला होता. उद्धवाचे विचारचक्र सुरु होते. सद्गुरू आज्ञा म्हणून श्रीकृष्णाचा त्याग करून बद्रिकाश्रमात जावे तर मी येथे गेल्यावर हा निजधामाला जाईल. त्यामुळे मला पुन्हा ह्याचे दर्शन होणार नाही. हा विचार मनात येताच उद्धवाची अवस्था अनावर झाली. त्याला अत्यंत प्रिय असलेले श्रीकृष्णाचे रूप त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. निळ्यासावळ्या घनदाट ढगाप्रमाणे रंग, कमळासारखे डोळे असलेला परिपूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण त्याच्या मनात घर करून राहिला.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.