साधना सक्सेना आर्मी मेडिकल सर्व्हिसच्या डीजी
एअर मार्शल रँकपर्यंत पोहोचणाऱ्या दुसऱ्या महिला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांना बुधवारी आर्मीच्या मेडिकल सर्व्हिसचे डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. साधना सक्सेना या 1 ऑगस्टपासून पदभार सांभाळताच या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वायुदलात एअर मार्शल पदावर पदोन्नती झाल्यावर सक्सेना यांना हॉस्पिटल सर्व्हिसेस (आर्म्ड फोर्सेस)च्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती मिळाली होती. वायुदलात एअर मार्शल रँकपर्यंत पोहोचणाऱ्या साधना सक्सेना या दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत.
यापूर्वी साधना यांना एअर फोर्स ट्रेनिंग कमांड बेंगळूर मुख्यालयातून दिल्लीत पदोन्नतीवर बदली करण्यात आली होती. त्यांचे पती के.पी. नायर हे 2015 मध्ये इन्स्पेक्शन अँड फ्लाइट सेफ्टीच्या डायरेक्टर जनरल पदावरून निवृत्त झाले आहेत. अशाप्रकारे साधना सक्सेना आणि के.पी. नायर हे एअर मार्शल रँकपर्यंत पोहोचणारे देशातील पहिले दांपत्य ठरले आहे.
वायुसेना अधिकारी साधना सक्सेना नायर यांनी पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून पदवी मिळविली आहे. डिसेंबर 1985 मध्ये त्यांनी भारतीय वायुदलाच्या सेवेत प्रवेश केला होता. फॅमिली मेडिसीनमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. स्वीत्झर्लंडमध्ये रासानयिक, जैविक, किरणोत्सर्गी, आण्विक वॉरफेयर आणि मिलिट्री मेडिकल एथिक्सचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.