Sadawaghapur Waterfall: उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई
उलटा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल
By : प्रवीण कांबळे
उंब्रज : सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान, या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या व वाहतुकीची शिस्त न पाळणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे.
उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पीआय रविंद्र भोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, एएसआय कचरे, पोलीस नाईक रोहित थोरवे, पोलीस कॉन्स्टेबल संजय मासाळ, प्रफुल पोतेकर यांनी उंब्रज पोलीस ठाणे अंकित तारळे दूरक्षेत्र हद्दीत सडावाघापुर रोड वजरोशी येथे नाकाबंदी केली.
यादरम्यान, 31 चारचाकी व 53 दुचाकी वाहने तपासून 38 वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून 28,500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. सडा वाघापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणेबाबत उंब्रज पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेले आहे.