सदाशिवगड दुर्गादेवी मंदिर दसरोत्सव आजपासून
कारवार : येथून जवळच्या इतिहासप्रसिद्ध सदाशिवगड येथील श्री दुर्गादेवीचे मंदिर दसरा महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. सदाशिवगड येथील सदाशिवगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्री दुर्गादेवीचे दर्शन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनवेळा घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळून येतो. यामुळे हा किल्ला स्थानिक लोक शिवाजी किल्ला म्हणून ओळखतात. दुर्गादेवीचे शिवाजी महाराजांनी दोनदा दर्शन घेतल्याने दुर्गादेवी उत्सवाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. दुर्गादेवीच्या महोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. अलिकडच्या काळात दुर्गादेवी मंदिराच्या दसरा महोत्सवात अधिक भर पडली आहे. महोत्सवाला दि. 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर उत्सवाची सांगता विजयादशमीने होणार आहे.
येथील दसरा महोत्सवात कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील हजारो भाविक सहभागी होतात. उत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. उत्सवाच्या कालावधीत कीर्तन, पूजा, लिलाव व दांडिया आदींचे आयोजन केले आहे. विजयादशमी दिवशी भव्य मिरवणूक, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी 1 वाजेपर्यंत तुलाभार, ओटी भरणे, कणीक अर्पण करणे श्रीचे दर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता सदाशिवगड किल्ल्याच्या आतील देवीच्या मूळ स्थानाकडे पूजा अर्चा कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर ]़]़]़श्रीच्या मूर्तीचे पालखीतून इतर देवतासह सीमोलंघनासाठी प्रयाण होणार आहे. शिवाजी चौक जवळ सोने लुटण्याचा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती श्री दुर्गादेवी उत्सव समितीने दिली आहे.
तालुक्यातील अन्य मंदिरेही सज्ज
दरम्यान, सदाशिवगड येथील सुप्रसिद्ध श्री महामाया देवस्थानसह अन्य मंदिरेही नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाली आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्त कारवार तालुक्यात अनेक ठिकाणी दुर्गेची प्रतिष्ठापना केली जाते. दुर्गा मूर्ती घडविणारे अनेक कलाकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवीत आहेत. तर अनेक मंडळे दांडिया, गरबा आदींच्या नियोजनात व्यस्त आहेत.