सदानंदगौडा निवडणूक राजकारणातून निवृत्त
बेंगळूर : अलीकडे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा करत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. या पाठोपाठ आता माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी देखील निवडणूक राजकारणातून निवत्तीची घोषणा केली आहे. हासन येथे बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मला भाजपमधून अनेक महत्त्वाची पदे मिळली आहेत. यापेक्षा अधिक पदे भूषविण्यास इच्छूक नाही. आपल्या 30 वर्षांच्या राजकीय जीवनात भाजपने सर्व काही दिले आहे. त्यामुळे मी आता निवडणूक राजकारणातून पुढे वाटचाल करणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत सदानंदगौडा यांनी आगामी लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी 10 वर्षे आमदारपद भूषविले आहे. 20 वर्षे खासदार म्हणून काम केले आहे. एक वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. चार वर्षे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष संघटना केली आहे. सात वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून सेवा बजावली आहे. मला यापेक्षा अधिक काही नको, असे त्यांनी स्पष्ट केले.