सदानंदगौडा काँग्रेसच्या वाटेवर
तिकीट न मिळाल्याने आज पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूर उत्तर मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी सदानंदगौडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद बोलावली आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सर्वकाही स्पष्ट करेन, असे सांगितले आहे. त्यामुळे कुतूहल निर्माण झाले आहे.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सदानंदगौडा यांना भाजप हायकमांडने तिकीट नाकारले आहे. उडुपी-चिक्कमंगळूरच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांना बेंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करताच सदानंदगौडांना धक्काच बसला. त्यांनी आपली नाराजी उघड केली. दरम्यान, मागील चार दिवसांपासून सदानंदगौडा यांनी आपल्या समर्थकांशी चर्चा केली आहे.
सोमवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला, ही बाब खरी आहे, असे सांगून सदानंदगौडा यांनी काँग्रेसप्रवेशाचे संकेत दिले आहेत. सोमवारी सदानंदगौडा यांनी आपल्या निवासस्थानी वाढदिवस साजरा केला. काँग्रेसमधील एका नेत्याने माझी घरी भेट घेऊन चर्चा केली आहे. कुटुंबीयांशी चर्चा करून पुढील भूमिका निश्चित करणार आहे. मंगळवारी सर्वकाही स्पष्ट करेन, असे त्यांनी सांगितले.
ईश्वरप्पा यांच्याविषयी बोलताना सदानंदगौडा म्हणाले, मी ईश्वरप्पांशी संपर्क साधला. ज्यांना तिकिट मिळाले नाही, अशा सर्व नेत्यांनी हायकमांडची भेट घेण्याची तयारी केली होती. परंतु, याआधीच ईश्वरप्पांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या भूमिकेविषयी मी काही बोलू शकत नाही. राज्य राजकारणात माझ्यावर झालेल्या अन्याय उघड करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट करेन, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
ईश्वरप्पाही भूमिकेवर ठाम
लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या मुलाला हावेरी मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी शिमोगा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी रा. स्व. संघ नेत्यांनी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत. अयोध्येतून रा. स्व. संघ नेते गोपाल यांनी ईश्वरप्पा यांना फोन करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ईश्वरप्पा यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला. पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीला विरोध केला आहे. मात्र, शिमोग्यात घराणेशाहीला वाव दिला आहे, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.