फडणवीसांना घेऊन सदाभाऊ भेटले केंद्रीय व्यापारमंत्र्यांना
दूध उत्पादकांना अनुदान, कांदा निर्यात बंदी, इथेनॉल बंदी उठवण्याची मागणी
इस्लामपूर प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रयत क्रांतीचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांची सह्याद्री अतिथिगृहावर भेट घेतली. दूध उत्पादकांना लिटर मागे पाच रुपये अनुदान, कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मिती बंदी मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याचे खोत यांनी सांगितले. राज्यातील दूध उत्पादक, कांदा उत्पादक, ऊस उत्पादक, कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने ही भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक मोठ्या अडचणी मध्ये आहे ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. दुधाचे प्रतिलिटर दर २५ ते २६ रुपये पर्यंत उतरले आहेत. राज्यामध्ये ४० हजार मॅट्रिक टन दुधाची भुकटी शिल्लक आहे. तरी सदर भुकटीला आणि लोणीला निर्यात अनुदान देऊन जागतिक बाजारपेठेमध्ये विक्रीस चालना द्यावी, तसेच दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात यावे. कांदा उत्पादक सुद्धा आंदोलन करत आहे. तरी कांद्यावरील निर्यात बंदी हटवणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण झाला असून इथेनॉलवरील बंदीमुळे इथेनॉल निर्माण करणारे कारखाने भविष्यात आर्थिक अडचणीत सापडतील. त्यामुळे इथेनॉलवरील बंदी उठवणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये ७० हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आलेली आहे. बंदीच्या निर्णयामुळे हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडेल. त्यामुळे ही बंदी उठवण्या बाबत निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्या प्रश्नाकडे देखील सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.