सचिन सिवाच, लक्ष्य चहर उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ बरेली
येथे सुरु असलेल्या आठव्या इलाईट पुरूषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचव्या दिवशी सेनादलाच्या मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी केली. सचिन सिवाच आणि लक्ष्य चहर यांच्यासह अन्य सात मुष्टीयोद्ध्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
माजी विश्व युवा चॅम्पियन सेनादलाच्या सिवाचने 55-60 किलो लाईट वेट गटात हिमाचल प्रदेशच्या आशिषकुमारचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 75-80 लाईट हेविवेट गटात सेनादलाच्या लक्ष्य चहरने प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले. सेनादलाच्या जादूमनीसिंग एम. ने फ्लायवेट गटात, पवन बर्तवालने बँटमवेट गटात, हितेशने लाईट मिडलवेट गटात दीपकने वेल्टरवेट गटात, जुगनूने व्रुइजरवेट गटात, विशालने हेविवेट तर गौरव चौहानने सुपर हेविवेट गटात उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे वेल्टरवेट गटातील विद्यमान विजेत्या शिवा थापाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना मणिपूरच्या मेंगबामचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. हिमाचल प्रदेशच्या जमवालने हरियाणाच्या अन्शूलचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.