For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगलीच्या सचिन खिलारीचे आशियाई विक्रमासह सुवर्ण

06:20 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांगलीच्या सचिन खिलारीचे आशियाई विक्रमासह सुवर्ण
Advertisement

वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोळाफेक प्रकारात सुवर्णयश

Advertisement

वृत्तसंस्था/ कोबे (जपान)

सांगली जिल्ह्यातील करगणी गावच्या सचिन सर्जेराव खिलारीने बुधवारी वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. सचिनने 16.30 मीटर गोळा फेकत आपलाच 16.21 मीटरचा आशियाई विक्रम मोडित काढला. गतवर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने हा विक्रम नोंदवला होता. दरम्यान, जपानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत या स्पर्धेत 5 सुवर्णासह एकूण 12 पदके जिंकली आहेत तर चीन 18 सुवर्णपदकासह अव्वलस्थानी आहे.

Advertisement

जपानमधील कोबे शहरात वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय पथकाने शानदार कामगिरी साकारत आतापर्यंत पाच सुवर्णपदकांची कमाई केली आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा रहिवासी असलेल्या सचिन खिलारीने या स्पर्धेत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. शाळेत असताना सचिनसोबत अपघात झाला. या अपघातात त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. अनेक शस्त्रक्रिया करुनही त्याचा हात बरा झाला नाही. पण यातून सचिन कधीच खचला नाही. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी साकारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मागील चार वर्षापासून सचिन पुणे येथे सराव करत आहे. विशेष म्हणजे, सचिन हा पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आता, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असणार आहे.

स्पर्धेचे अद्याप तीन दिवस बाकी आहेत. अपेक्षेप्रमाणे चीनने अग्रस्थान मिळवले असून ब्राझीलचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला उर्वरित तीन दिवसात आणखी पदक मिळवण्याची नामी संधी असणार आहे. आम्ही या स्पर्धेत खूप आशावादी आहोत. आम्हाला आणखी दोन सुवर्णपदकाची अपेक्षा असल्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक सत्य नारायण यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया

वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आशियाई विक्रमासह सुवर्ण जिंकल्याचा खूप आनंद झाला आहे. स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे लक्ष्य असणार आहे.

सचिन खिलारी, पॅरा अॅथलिट, भारत

प्रतिक्रिया

सचिनने हाताच्या अपंगत्वावर जिद्दीने मात करत भारतासाठी वर्ल्ड रेकॉर्ड करत सुवर्णपदक पटकावले. ऑलिंपिकसाठी तो पात्र ठरला ही बाब खिलारी कुटुंबीयांसह संपूर्ण समाजाला, करगणी गावाला आणि आटपाडी तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 1994 मध्ये त्याच्या आईचे छत्र हरवले. पण कधीही आम्हा कुटुंबीयांनी या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही. त्याचा योग्य सांभाळ व सदैव प्रोत्साहन दिले. गतवर्षी पॅरिस येथे झालेल्या जागतिक पॅराअॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले होते. चालू वर्षी त्याने अथक परिश्रमाने यशाला गवसणी घातली याचा आम्हाला आनंद व अभिमान आहे.

रामचंद्र खिलारी, करगणी (सचिनचे चुलते)

Advertisement
Tags :

.