For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुमराह-अर्शदीपसमोर अफगाणिस्तानचे लोटांगण

06:10 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बुमराह अर्शदीपसमोर अफगाणिस्तानचे लोटांगण
Advertisement

टीम इंडियाचा सुपर-8 मधील पहिला विजय : सामनावीर सुर्याचे अर्धशतक : बुमराह-अर्शदीपचे प्रत्येकी तीन बळी : अफगाण संघ 47 धावांनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था /बार्बाडोस, वेस्ट इंडिज

ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर टी-20 वर्ल्डकपमधील डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानला टीम इंडियाने पराभवाचा दणका दिला. प्रारंभी, सूर्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा केल्या. भारताच्या 182 धावांचा पाठलाग करताना अफगाण संघ 134 धावांवर ऑलआऊट झाला. भारताचा हा सुपर 8 फेरीतील पहिलाच विजय ठरला. टीम इंडियाने अफगाणवर 47 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकपमधील आपला विजयी धडाका कायम ठेवला. 28 चेंडूत 53 धावांची महत्वपूर्ण खेळी करणाऱ्या सुर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टीम इंडियाचा पुढील सामना दि. 24 रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.

Advertisement

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने पहिल्याच षटकात 13 धावा फटकावल्या. पण त्यानंतर दुसऱ्या षटकात बुमराह हा गोलंदाजीला आला आणि त्याने फटकेबाजी करणाऱ्या रहमनुल्लाह गुरबाजला (11 धावा) बाद केले. यानंतर हजमतउल्लाह व इब्राहिम झद्रन हे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अफगाणकडून ओमरजाईने सर्वाधिक 26 धावा केल्या तर नजीबुल्लाह झद्रनने 19 तर मोहम्मद नाबीने 14 धावा केल्या. बुमराह, अर्शदीप, कुलदीप यादव, जडेजा व अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांचा डाव 134 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून बुमराह व अर्शदीपने प्रत्येकी तीन गडी बाद केले.

टीम इंडियाचा विजयी धडाका कायम

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या या मैदानावर तिसऱ्याच षटकात भारताला रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. फजलहक फारुकीने रोहितला बाद केले. हिटमॅन 13 चेंडूत 8  धावा केल्या. यानंतर रिषभ पंतही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात रशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिषभने 20 धावा केल्या. रिषभनंतर पाठोपाठ विराट कोहलीलाही रशीदने तंबूचा रस्ता दाखवला. विराटने 1 षटकारासह 24 धावांचे योगदान दिले.

सुर्यकुमारची संयमी अर्धशतकी खेळी

सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची 3 बाद 62 अशी स्थिती झाली होती. मुंबईकर शिवम दुबेही (10 धावा) स्वस्तात तंबूत परतला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. सूर्या यावेळी चांगल्या फॉर्मात दिसत होता, सूर्याने रशीद खानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. रशीदच्या एकाच षटकात त्याने चौकार आणि षटकारही वसूल केले. दणदणीत फटकेबाजी करत सूर्याने यावेळी आपले अर्धशतक झळकावले. सूर्याचे हे या वर्ल्ड कपमधील दुसरे अर्धशतक ठरले. त्याने 28 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 53 धावा केल्या. सुर्याला फारुकीने बाद करत अफगाणिस्तानला मोठे यश मिळवून दिले. हार्दिकने 24 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 32 धावा करत त्याला चांगली साथ दिली. सुर्या व हार्दिक बाद झाल्यानंतर मात्र भारताला जास्त धावा करता आल्या नाहीत. जडेजा 7 तर अक्षर पटेल 12 धावा काढून बाद झाला. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेत भारतीय फलंदाजांना दडपणाखाली ठेवले.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 8 बाद 181 (रोहित शर्मा 8, विराट कोहली 24, रिषभ पंत 20, सुर्यकुमार यादव 28 चेंडूत 53, शिवम दुबे 10, हार्दिक पंड्या 32, अक्षर पटेल 12, फजल फारुकी व रशीद खान प्रत्येकी 3 बळी, नवीन उल हक 1 बळी) अफगाणिस्तान 20 षटकांत सर्वबाद 134 (गुरबाज 11, गुलबदिन नईब 17, ओमरजाई 26, नजीबुल्लाह झद्रन 19, मोहम्मद नाबी 14, जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग प्रत्येकी तीन बळी, कुलदीप यादव 2 तर अक्षर पटेल व जडेजा प्रत्येकी एक बळी).

अफगाणविरुद्ध भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात

टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे बेंगळूर येथे गुरुवारी निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी टीम इंडिया दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरली. जॉन्सन यांनी आपल्या कारकिर्दीत 2 कसोटी आणि 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ते कर्नाटक संघाचा महत्त्वाचा भाग होते. अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद आणि डोडा गणेश यांच्यासह कर्नाटकच्या गोलंदाजीचा ते महत्त्वाचा भाग होते.

Advertisement
Tags :

.