बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांना डॉक्टरेट ! संगीत चिकित्सकाच्या संशोधनाचा सन्मान : शिवाजी विद्यापीठाकडून गौरव
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरातील पहिले बासरी वादक व पश्चिम महाराष्ट्रातील पहिले संगीत चिकित्सक प्रा. सचिन जगताप यांना शिवाजी विद्यापीठातील कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागातील बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरेट मिळाली. त्यांनी ‘द इम्पॅक्ट ऑफ म्युझिक ऑन कंझ्यूमर सॅटिसफॅक्शन अँड एम्प्लॉईज एफिशियन्सी इन सिलेक्टेड ऑर्गनायझेशन इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला. भारतातून शिवाजी विद्यापीठामार्फत पहिल्यांदा या अनोख्या विषयावर शोध प्रबंध केला गेला.
सचिन जगताप हे गेली सतरा वर्षे संगीत चिकित्सेव्दारे अनेक रुग्णांना मोफत चिकित्सा देत आहेत. आज काल अनेक रिटेल मॉल, रेस्टॉरंट्स, एक्झिबिशन्स, तसेच बँक ऑफिसमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक लावतात. हे संगीत जे ग्राहक ऐकतात त्यांच्या मनावर आणि खरेदीच्या निवडीवर परिणाम होत असतो हॉटेलमध्ये संगीत ऐकत असताना भोजन करण्यास उपयुक्त वातावरण निर्माण होते. पण हे संगीत कोणत्या प्रकारचे असावे आणि संगीताचे कोणते गुणधर्म असले पाहिजेत अशा प्रकारचे संशोधन जगताप यांनी करून त्यांनी एक मॉडेल विकसित केले आहे. सामाजिक कार्यात सहभाग असणाऱ्या जगताप यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राध्यापकांसाठी ‘स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू म्युझिक’ या विषयावर व्याख्यानही झाली आहेत. त्यांनी अनेक शोध निबंध सादर केले आहेत व प्रसिद्ध झाले आहेत. गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी त्यांनी अव्वल क्रमांकाने मिळवली आहे. त्यांनी पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर, पद्मश्री पंडित सुरेश वाडकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी, पद्मविभूषण आशा भोसले अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर व रियालिटी शो मधील अनेक कलाकारांबरोबर त्यांनी साथ संगत केली आहे. कोल्हापूरमध्ये संगीतकार दत्ता डावजेकर, संगीतकार लक्ष्मीकांत- प्यारेलाल शर्मा, संगीतकार श्रीनिवास खळे अशा अनेक दिग्गज कलाकारांना पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आणून रसिक प्रेक्षकांना त्यांच्या श्रवणीय गीतांचा लाभ दिला आहे. आज पर्यंत सचिन जगताप यांना सुधीर फडके पुरस्कार, माण कलाभूषण पुरस्कार, अशा विविध 14 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जगताप हे छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट (सायबर) मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठ सिग्नेचर ट्यून तयार केली आहे. त्यांचे बासरीचे गुरु पंडित हरिश्चंद्र कोकरे, पंडित नित्यानंद हळदीपूर, पंडित प्रवीण गोडखिंडी व सुगम संगीताचे गुरु ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, लक्ष्मीकांत प्यारेलाल शर्मा, पंडित रमाकांत परांजपे आणि पंडित श्यामकान परांजपे हे आहेत.
सचिन जगताप यांच्या संशोधनासाठी निबंधासाठी प्रिन्सिपल डॉ. गुरुनाथ फगरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. एस. एस. महाजन, सायबरचे सचिव डॉ. रणजित शिंदे, विश्वस्त सी.ए. ऋषिकेश शिंदे, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. के. व्ही. मारुलकर, डॉ. प्रवीण चव्हाण, पत्नी सौ. वैशाली जगताप यांचे सहकार्य लाभले.