कोल्हापूरात काँग्रेसला धक्का ; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात!
कोल्हापुर :
कोल्हापूर उत्तरमधून तिकिट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव या शिवसेनेत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत जाधव हे आमदार झाले होते. 2021 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर लागलेल्या पोट निवडणुकीमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या होत्या.
जयश्री जाधव यांचे काँग्रेसकडून तिकिट नाकारून राजेश लाटकर यांना तिकिट देण्यात आले, पण त्यांच्याही उमेदवारीला विरोध झाल्याने मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. जयश्री जाधव यांच्या बंडखोरीने त्यांना ताकद मिळाली असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात तगडा झटका बसला आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार जयश्री जाधव यांना महिलांसाठी काम करायचे आहे. त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे कोल्हापुरात शिवसेना आणखी मजबूत होईल.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, "मला मुळातच समाजसेवा करायचे आहे. महिलांसाठी काम करायचा आहे. महिला पुढे यायला हव्यात स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत. 2022 मध्ये झालेल्या कोल्हापूर पोटनिवडणुकीत आपण काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आलो. दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली. आणखी संधी मिळायला हवी होती मात्र पक्षाने तिकीट दिले नाही. "