सचिन बेबीचे शतक हुकले, केरळने गमावली आघाडीची संधी
केरळच्या पहिल्या डावात 342 धावा : विदर्भाला 37 धावांची आघाडी : आदित्य सरवटेचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ नागपूर
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात केरळने विदर्भाला जोरदार प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 342 धावा केल्या. कर्णधार सचिन बेबीचे शतक दोन धावांनी हुकले तर आदित्य सरवटेने शानदार अर्धशतक खेळी साकारली. तरीही विदर्भाने केरळला 342 धावांत गुंडाळत 37 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली आहे. आता, सामन्याच्या चौथ्या दिवशी विदर्भाचा संघ मोठी आघाडी घेण्यात यश मिळवतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या दिवशी केरळने विदर्भाला 379 धावांत गुंडाळले. यानंतर केरळ संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर मैदानात असलेल्या अक्षय चंद्रन आणि आदित्य सरवटे यांनी केरळचा डाव सावरला होता. मुळचा विदर्भाचा पण सध्या केरळकडून खेळणाऱ्या 35 वर्षीय आदित्य सरवटेने अहमद इम्रानला सोबतीला घेत संघाला सावरले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी साकारली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच इम्रानला यश ठाकूरने बाद करत केरळला मोठा धक्का दिला. इम्रानने 37 धावांची खेळी शानदार खेळी साकारली. यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस सरवटे व कर्णधार सचिन बेबी यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केरळने 39 षटकांत 3 गडी गमावत 131 धावा केल्या होत्या.
सचिनचे शतक हुकले, सरवटेची 79 धावांची खेळी
याच धावसंख्येवरुन केरळने तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. स्टार फलंदाज सरवटेने 79 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली आणि तो आऊट झाला. त्याला हर्ष दुबेने बाद करत विदर्भाला मोठे यश मिळवून दिले. दुसरीकडे, कर्णधार सचिन बेबीने मात्र संयमी खेळी साकारत 10 चौकारासह 98 धावा केल्या. त्याचे शतक मात्र दोन धावांनी हुकले. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला पार्थ रेखाडेने बाद केले. तळाच्या फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने केरळने आघाडी घेण्याची महत्वपूर्ण संधी गमावली. मोहम्मद अझरुद्दिनने 34 धावा केल्या तर जलज सक्सेनाने 28 धावांचे योगदान दिले. यानंतर केरळचा पहिला डाव 125 षटकांत 342 धावांत आटोपला.
विदर्भाच्या दर्शन नळकांडे, हर्ष दुबे व पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. यश ठाकूरला एक विकेट घेण्यात यश मिळाले. अर्थात, सामन्याला अद्याप दोन दिवस बाकी आहेत. आजच्या चौथ्या दिवशी विदर्भाचा संघ मोठी आघाडी घेण्यात यश मिळवतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव 379 (दानिश मालेवार 153, करुण नायर 86, यश ठाकूर 25, अक्षय वाडकर 23, निधीश व एडन प्रत्येकी तीन बळी)
केरळ पहिला डाव 125 षटकांत सर्वबाद 342 (आदित्य सरवटे 79, अहमद इम्रान 37, सचिन बेबी 98, अझरुद्दिन 34, रेखाडे, नळकांडे व हर्ष दुबे प्रत्येकी तीन बळी).