साबालेन्काचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद
पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियन जोडी मॅक्स पर्सेल-जॉर्डन थॉम्पसन विजेती
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
बेलारुसच्या द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्काने अमेरिकन ओपन स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावत कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले. अंतिम फेरीत तिने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव केला पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेल व जॉर्डन थॉम्पसन यांनी जर्मनीच्या जोडीवर मात करून अजिंक्यपद पटकावले.
साबालेन्काने चुरशीच्या झालेल्या अंतिम लढत जेसिका पेगुलावर 7-5, 7-5 अशी संघर्षपूर्ण मात केली. तिचे हे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. यापूर्वी तिने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे सलग दोनदा जेतेपद मिळविले आहे. दुसऱ्या सेटमध्ये पेगुला 0-3 अशी पिछाडीवर पडली होती. पण तिने जिगरबाज व झुंजार खेळ करीत पिछाडी भरून काढत 5-3 अशी आघाडी घेतली होती. पण साबालेन्काच्या दृढनिर्धारामुळे पेगुलाला सेटसह जेतेपदही गमवावे लागले. पाचव्या सेटपॉईंटवर तिने सामना संपवला. 26 वर्षीय साबालेन्काने 40 विजयी फटके मारत एकाच मोसमात हार्डकोर्टवरील दोन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी 2016 नंतरची पहिली महिला टेनिसपटू बनली आहे. 2016 मध्ये जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने असा पराक्रम केला होता. ‘अनेकदा मी जेतेपदाच्या जवळ येऊनही मी त्यापासून वंचित राहिले होते. पण अखेर ते साध्य केले आणि त्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही,’ अशा भावना साबालेन्काने व्यक्त केल्या. 2022 व 2023 मध्ये तिने या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. ‘स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न सोडू नका, कठोर परिश्रम करा, यश नक्कीच मिळेल. या यशाचा मला सार्थ अभिमान वाटतो,’ असेही ती म्हणाली.
उत्तर अमेरिकेच्या हार्ड कोर्ट टेनिस मोसमात पेगुलाने टोरँटो स्पर्धा जिंकली तर सिनसिनॅटी स्पर्धेत ती उपविजेती ठरली होती. असे यश मिळवित ती अमेरिकन स्पर्धेत उतरली होती. सिनसिनॅटी स्पर्धाही साबालेन्काने जिंकली होती. येथील लढत पाहण्यासाठी 23000 प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती, त्यात ऑलिम्पिक 100 मी. चॅम्पियन नोह लायल्स, एनबीए स्टार स्टेफ करी, फॉर्मुला वन माजी चॅम्पियन लेविस हॅमिल्टन यांचाही समावेश होता.
पुरुष दुहेरीत पर्सेल-थॉम्पसन अजिंक्य
ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेल व जॉर्डन थॉम्पसन यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत जर्मनीच्या दहाव्या मानांकित केव्हिन क्रॅवीट्झ व टिम प्युट्झ यांच्यावर 6-4, 7-6 (7-4) अशी मात केली. जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत या जोडीला जेतेपदाच्या लढतीत तीन मॅचपॉईंट्सचा लाभ घेता न आल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या सातव्या मानांकित जोडीला तीन चॅम्पियनशिप पॉईंट्सची गरज लागली. 1996 नंतर ऑस्ट्रेलियन जोडीने ही स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1996 मध्ये टॉड वूडब्रिज व मार्क वूडफोर्ड यांनी ही स्पर्धा जिंकली होती. पर्सेलचे हे दुहेरीतील एकूण दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. याआधी 2022 मध्ये त्याने मॅथ्यू एब्डनसमवेत जेतेपद पटकावले होते. थॉम्पसनचे मात्र हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.