For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साबालेन्का, स्वायटेक उपांत्य फेरीत दाखल

06:55 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
साबालेन्का  स्वायटेक उपांत्य फेरीत दाखल
Advertisement

जोकोविच, सिनर, व्हेरेव्ह, बॉइसन, गॉफ, कीज उपांत्यपूर्व फेरीत, स्विटोलिना, पेगुला, किनवेनचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

अग्रमानांकित एरीना साबालेन्का, पाचवी मानांकित इगा स्वायटेक यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली तर पुरुष एकेरीत नोव्हॅक जोकोविचने फ्रेंच ओपनमधील 100 वा विजन नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे अग्रमानांकित जेनिक सिनर, अलेक्झांडर बुबलिक, तिसरा मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह यांनी तर महिला एकेरीत फ्रान्सची बिगरमानांकित लोइस बॉइसनने पेगुलाला धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. झेंग किनवेन, तिसरी मानांकित जेसिका पेगुला, स्विटोलिना यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

Advertisement

फ्रेंच ओपनचे पहिले जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या साबालेन्काने अडखळत झालेल्या सुरुवातीवर मात करीत चीनच्या आठव्या मानांकित झेंग किनवेनचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव करून शेवटच्या चार फेरीत स्थान मिळविले. झेंगवरील हा तिचा सातवा विजय असून झेंगने फक्त एकदाच तिला हरविले आहे. स्कोअरवरून वाटत नसले तरी ही लढत बरीच चुरशीची झाली. दोघींही तोडीस तोड खेळ करीत होत्या. पण मोठ्या गुणावेळी साबालेन्काने आपला दर्जा दाखवत गुण मिळविले. झेंगला मात्र महत्त्वाच्या गुणावेळी सर्व्हिसशी संघर्ष करावा लागला. साबालेन्का आता सहाव्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तिची उपांत्य लढत विद्यमान चॅम्पियन पोलंडच्या इगा स्वायटेकशी होईल. येथील पराभवामुळे झेंगची या स्पर्धेतील सलग दहा विजयाची मालिका खंडित झाली. पाचव्या मानांकित स्वायटेकने 13 व्या मानांकित इलेना स्विटोलिनाचा 6-1. 7-5 असा पराभव करून तिला स्पर्धेबाहेर घालविले.

बॉइसनचा पेगुलाला धक्का

अन्य एका सामन्यात फ्रेंच ओपनमध्ये याआधी कधीही न खेळलेल्या फ्रान्सच्या 21 वर्षीय बिगरमानांकित लोइस बॉइसनने चौथ्या फेरीतील सामन्यात तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला 3-6, 6-4, 6-4 असा पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. बॉइसन जागतिक क्रमवारीत सध्या 361 व्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या कोको गॉफनेही उपांत्यपूर्व फेरी गाठताना 20 व्या मानांकित एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाचा 6-0, 7-5 असा पराभव केला. 18 वर्षीय मायरा अँड्रीव्हानेही 17 व्या मानांकित दारिया कॅसात्किनावर 7-5, 6-3 अशी मात करीत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. सातव्या मानांकित अमेरिकेच्या मॅडिसन कीजने हेली बाप्टिस्टचा 6-3, 7-5 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. कीज व गॉफ यांच्यात उपांत्यपूर्व लढत होईल.

सिनर, व्हेरेव्हची आगेकूच

पुरुष एकेरीत अग्रमानांकित जेनिक सिनरने 17 व्या मानांकित आंद्रे रुबलेव्हचा 6-1, 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसरा मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह टॅलन ग्रीकस्पूरवरविरुद्ध 6-4, 3-0 असा आघाडीवर असताना ग्रीकस्पूरने माघार घेतल्याने व्हेरेव्हला उपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल मिळाली. पोटदुखीमुळे माघार घेतल्याचे ग्रीकस्पूरने नंतर सांगितले.

अन्य एका सामन्यात नोव्हॅक जोकोविचने फ्रेंच ग्रँडस्लॅममधील 100 वा विजय मिळविताना अमेरिकेच्या कॅमेरॉन नोरीचा 6-2, 6-3, 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची पुढील लढत अलेक्झांडर व्हेरेव्हशी होईल. अलेक्झांडर बुबलिकने चौथ्या फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित जॅक ड्रेपरचे आव्हान 5-7, 6-3, 6-2, 6-4 असे संपुष्टात आणत आगेकूच केली.

Advertisement
Tags :

.