साबालेन्का, राडुकानू, अल्कारेझ, जोकोविच, फ्रिट्झ तिसऱ्या फेरीत
विम्बल्डन ग्रँडस्लॅम : पाओलिनी, टायफो पराभूत, नोरी, अँड्रीव्हा, कॉलिन्स, डिमिट्रोव्ह यांची आगेकूच
वृत्तसंस्था/लंडन
विम्बल्डन स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही काही मानांकित खेळाडूंना बाहेर पडावे लागले तरी आर्यना साबालेन्का, कार्लोस अल्कारेझ, एम्मा राडुकानू, मॅडिसन कीज, रायबाकिना, कॉलिन्स, अँड्रीवहा, जोकोविच, डिमिट्रोव्ह, टेलर फ्रिट्झ, कॅमेरॉन नोरी यांनी तिसरी फेरी गाठली. पराभूत होणाऱ्यांत 12 वा मानांकित फ्रान्सेस टायफो, गतउपविजेती जस्मिन पाओलिनी, बियाट्रिझ हदाद माइया, लैला फर्नांडेझ यांचा समावेश आहे. अग्रमानांकित आर्यना साबालेन्काने या स्पर्धेची तिसरी फेरी गाठताना मेरी बुझकोव्हाचा 7-6 (7-4), 6-4 असा पराभव केला.
दुसऱ्या दिवशीपर्यंत एकूण 23 मानांकित खेळाडू पराभूत झाले. तिसऱ्या दिवशी त्यात आणखी पाच महिलांची भर पडली. ब्रिटनच्या राडुकानूने 2023 ची विम्बल्डन चॅम्पियन मर्केटा व्होन्ड्रोसोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव केला तर ऑस्टेलियन ओपन चॅम्पियन सहाव्या मानांकित मॅडिसन कीजने ओल्गा डॅनिलोविचवर 6-4, 6-2 अशी मात केली. पाओलिनीला बिगरमानांकित कॅमिला रखिमोव्हाने 4-6, 6-4, 6-4 असे हरविले तर 12 व्या मानांकित डायना श्नायडरला डायने पॅरीने 6-4, 6-1, असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले. गुरुवारच्या सामन्यात एलेना रायबाकिनाने मारिया साकेरीचा 6-3, 6-1, डॅनियली कॉलिन्सने व्हेरोनिया इरावेचचा पराभव केला.
फ्रिट्झ, जोकोविच विजयी
पुरुष एकेरीत विद्यमान विजेत्या अल्कारेझने विजयाची मालिका 20 सामन्यावर नेताना पात्रता फेरीतून आलेल्या ऑलिव्हर टार्वेझचा 6-1, 6-4, 6-4 असा पराभव केला तर पाचव्या मानांकित टेलर फ्रिट्झने सलग दुसऱ्या सामन्यात पाच सेट्समध्ये कॅनडाच्या गॅब्रिएल डायलोवर 3-6, 6-3, 7-6 (7-0), 4-6, 6-3 अशी मात केली. कॅमेरॉन नोरीने फ्रान्सेस टायफोचे आव्हान 4-6, 6-4, 6-3, 7-5 असे संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. गुरुवारी सहाव्या मानांकित नोव्हाक जोकोविचने डॅन इव्हान्सचा 6-3, 6-2, 6-0, 19 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हने कोरेन्टिन मुटेटचा 7-5, 4-6, 7-5, 7-5 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
युकी भांब्री, एन.बालाजी, रित्विक दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत
भारताचा युकी भांब्री व त्याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गॅलोवे यांनी विम्बल्डन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्यांनी मोनॅकेचा रोमेन अर्नेवडो व फ्रान्सचा मॅन्युएन गीनार्ड यांचा पराभव केला. याशिवाय एन.श्रीराम बालाजी व रुत्विक बोलीपल्ली यांनीही आपापल्या साथीदारांसह दुसरी फेरी गाठली आहे. सोळावे मानांकन असलेल्या युकी-गॅलोवे यांनी अर्नेवडो व गीनार्ड यांच्यावर 7-6 (10-8), 6-4 अशी मात केली. एक तास 49 मिनिटे ही लढत रंगली होती. त्यांची पुढील लढत रॉबिन हास व जीन ज्युलियन रॉजेर किंवा मार्कोस गिरोन व नुनो बोर्जेस यापैकी एका जोडीशी होईल.
अनेक ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविलेल्या रोहन बोपण्णाला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. बेल्जियचा जोडीदार सँडर गिलीसमवेत खेळताना त्याला जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित केव्हिन क्रॅवीट्झ व टिम प्युएत्झ यांच्याकडून 3-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. आणखी एक भारतीय रित्विक चौधरी बोलिपल्ली व त्याचा कोलंबियन साथीदार निकोलस बॅरिएन्टोस यांनी फ्रान्सचा अलेक्झांड्रे म्युलर व बेल्जियमचा डेव्हिड गोफिन यांच्यावर 4-6, 6-4, 7-6 (13-11) अशी संघर्षानंतर मात केली. एन.श्रीराम बालाजी व मेक्सिकोचा मिग्वेल रेयेस व्हॅरेला यांनी अमेरिकेच्या लर्नर तिएन व अलेक्झांडर कोव्हासेविच यांचा 6-4, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. त्यांची पुढील लढत चौथ्या मानांकित मार्सेल ग्रॅनोलर्स व होरासिओ झेबालोस यांच्याशी होईल.