For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साबालेन्का, पेगुला, जोकोविच, अल्कारेझ उपांत्य फेरीत

06:55 AM Sep 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
साबालेन्का  पेगुला  जोकोविच  अल्कारेझ उपांत्य फेरीत
Advertisement

टेलर फ्रिट्झ, लेहेका, क्रेसिकोव्हा पराभूत तर व्होन्ड्रोसोव्हाची दुखापतीमुळे माघार

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, बेलारुसची आर्यना साबालेंका, अमेरिकेची जेसिका पेगुला यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम ओपन स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. टेलर फ्रिट्झ, जिरी लेहेका यांचे आव्हान संपुष्टात आले तर महिला दुहेरीत वयस्कर टेनिसपटू व्हीनस विल्यम्सच्या घोडदौडीलाही ब्रेक लागला.

Advertisement

दुसऱ्या मानांकित अल्कारेझने 20 व्या मानांकित जिरी लेहेकावर 6-4, 6-2, 6-4 असा सफाईदार विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. त्याने आतापर्यंत एकही सेट गमविलेला नाही. उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या नोव्हॅक जोकोविचशी होईल. एटीपी अग्रस्थानासाठी जोकोविच व अल्कारेझ यांच्यात चुरस असेल. 22 वर्षीय अल्कारेझने नवव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. 23 वर्षे होण्याच्या आत राफेल नदालने 10 वेळा अशी कामगिरी केली होती.

अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचे आव्हान 6-3, 7-5, 3-6, 6-4 असे संपुष्टात आणत आगेकूच केली. फ्रिट्झविरुद्ध त्याची 11 वेळा गाठ पडली असून सर्व सामने जिंकले आहेत. त्याने ग्रँडस्लॅमची विक्रमी 53 व्या वेळी उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने येथील स्पर्धेत तब्बल 14 वेळा उपांत्य फेरीत स्थान मिळविलेले आहे.

व्होन्ड्रोसोव्हाची माघार

महिला एकेरीत विद्यमान विजेती आर्यना साबालेंकाला एकही फटका न मारता उपांत्य फेरीत स्थान मिळाले. तिची प्रतिस्पर्धी मर्केटा व्होन्ड्रोसोव्हाने गुडघ्याला दुखापत झाल्याने माघार घेतल्याने तिला पुढे चाल मिळाली. व्होन्ड्रोसोव्हाने 2023 मध्ये विम्बल्डनचे जेतेपद मिळविले होते. दुखापतीमुळे तिला बराच काळ टेनिसपासून दूर रहावे लागल्याने तिचे मानांकनही घसरले असून ती बिगरमानांकित म्हणून या स्पर्धेत उतरली होती. तिने याआधीच्या लढतीत 2022 ची विम्बल्डन चॅम्पियन एलेना रायबाकिनाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. साबालेन्काची उपांत्य लढत चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाशी होईल. गेल्या वर्षी याच दोघींत अंतिम लढत झाली होती आणि त्यात साबालेन्काने विजय मिळविला होता.

पेगुलाने ग्रँडस्लॅम स्पर्धेची दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली असून तिने दोन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या बार्बरा क्रेसिकोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेची सलग दुसऱ्यांदा तिने शेवटच्या चारमध्ये प्रवेश केला असून सेरेना विल्यम्सनंतरची असा बहुमान मिळविणारी ती पहिली अमेरिकन आहे. सेरेनाने 2011 ते 2014 पर्यंत असा पराक्रम केला होता.

व्हीनस-लैला पराभूत

महिला दुहेरीत व्हीनस विल्यम्स व लैना फर्नांडेझ यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. व्हीनस-लैला यांना अग्रमानांकित टेलर टाऊनसेन्ड व कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी 6-1, 6-2 असे सहज हरविले. व्हीनसला प्रेक्षकांनी व तिच्या प्रतिस्पर्ध्यांनीही उभे राहून टाळ्या वाजवत मानवंदना दिली. टाऊनसेन्ड व सिनियाकोव्हा यांची पुढील लढत चौथ्या मानांकित व्हेरोनिका कुडरमेटोव्हा व एलिस मर्टेन्स यांच्याशी होईल.

Advertisement
Tags :

.