साबालेन्का, मॅडिसन कीज अंतिम फेरीत
ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस : पुरुष एकेरीत सिनेर उपांत्य फेरीत, स्वायटेकला धक्का, बेडोसा, डी मिनॉरही पराभूत
वृत्तसंस्था/मेलबर्न
सलग दोन वेळा जेतेपद मिळविलेल्या एरिना साबालेन्काने तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठत जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे तर पोलंडच्या संभाव्य विजेत्या मानल्या जात असलेल्या इगा स्वायटेकचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाला. पुरुष एकेरीत जेनिक सिनेरने डी मिनॉरचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. साबालेन्काने अकराव्या मानांकित पॉला बेडोसाचा 6-4, 6-2 असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळविले. मेलबर्न पार्कवरील तिची विजयाची मालिकाही 20 सामन्यापर्यंत वाढली आहे. स्टार खेळाडू 26 वर्षीय साबालेन्का 2025 या वर्षात आतापर्यंत अपराजित राहिली आहे.
तीनवेळा ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठणारी ती सेरेना विल्यम्सनंतरची पहिली महिला तर मार्टिना हिंगीसनंतरची सर्वात तरुण महिला टेनिसपटू बनली आहे. या विजयाने साबालेन्काने बेडोसाविरुद्ध विजयाची संख्या वाढवली असून तिने बेडोसाविरुद्ध सहा विजय मिळविले तर दोन सामने गमविले आहेत. जेतेपदासाठी तिची लढत अमेरिकेच्या चौदाव्या मानांकित मॅडिसन कीजशी शनिवारी होईल. मार्टिना हिंगीसने 1997 ते 1999 या कालावधीत सलग तीनदा ही स्पर्धा जिंकली होती. त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी साबालेन्काला मिळाली आहे. स्पेनची बेडोसा पराभूत झाली असली तरी नव्या डब्ल्यूटीए मानांकनात तिचे टॉप टेनमधील स्थान निश्चित झाले आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने कोको गॉफ या टॉप टेनमधील खेळाडूवर ग्रँडस्लॅममध्ये पहिल्यांदाच विजय मिळविला आहे.
स्वायटेकचे आव्हान समाप्त
अन्य एका उपांत्य सामन्यात 19 व्या मानांकित मॅडिसन कीजने द्वितीय मानांकित इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. तिने स्वायटेकवर 5-7, 6-1, 7-6 (10-8) अशी मात केली. अतिशय चुरशीची झालेल्या या लढतीत पहिला सेट जिंकून स्वायटेकने विजयाच्या देशेने आगेकूच केली होती. पण दुसऱ्या सेटमध्ये कीजने मुसंडी मारली आणि हा सेट 6-1 असा घेत बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये दोघींचा तोडीस तोड खेळ झाल्याने हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. टायब्रेकरमध्येही चुरस पहावयास मिळाली. पण अखेर कीजने 10-8 अशी बाजी मारत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
सिनेर उपांत्य फेरीत
पुरुष एकेरीच्या एका सामन्यात विद्यमान विजेत्या इटलीच्या जेनिक सिनेरने ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरचे आव्हान 6-3, 6-2, 6-1 असे एकतर्फी संपुष्टात आणत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. चौथ्या फेरीवेळी त्याला शारीरिक त्रास झाला होता, त्यातून सावरत त्याने हा सामना एक तास 48 मिनिटांत जिंकून आगेकूच केली. डी मिनॉरविरुद्ध सिनेरच्या आतापर्यंत दहा लढती झाल्या असून सर्व लढती सिनेरनेच जिंकल्या आहेत. 2020 मध्ये एका एटीपी सामन्यात दोघांची पहिल्यांदा गाठ पडली होती आणि त्यावेळी सिनेरने एक सेट गमविला होता. त्यानंतर आजवर एकदाही त्याने डी मिनॉरला सेट जिंकू दिलेला नाही. मिनॉरने गेल्या वर्षी तीन व या वर्षीच्या पहिल्या ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. बेन शेल्टनविरुद्ध त्याची उपांत्य लढत होणार आहे.