स्वायटेकला हरवून साबालेन्का अंतिम फेरीत
जोकोविच, सिनर उपांत्य फेरीत, अलेक्झांडर व्हेरेव्ह, बुबलिक यांचे आव्हान समाप्त, सारा इराणी-वावासोरी मिश्र दुहेरीत अजिंक्य
वृत्तसंस्था/पॅरिस
सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, इटलीचा अग्रमानांकित जेनिक सिनर यांनी येथे सु5 असलेल्या प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली तर अलेक्झांडर व्हेरेव्ह व अलेक्झांडर बुबलिक, पोलंडची इगा स्वायटेक यांचे आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत सारा इराणी व आंद्रेया वावासोरी यांनी जेतेपद पटकावले. महिला एकेरीत अग्रमानांकित एरीना साबालेन्काने पोलंडच्या पाचव्या मानांकित इगा स्वायटेकचे आव्हान 7-1 (7-1), 4-6, 6-0 असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. कोको गॉफ व लोइस बॉइसन यापैकी एकीशी तिची शनिवारी जेतेपदाची लढत होईल.
38 वर्षीय जोकोविचने जर्मनीच्या व्हेरेव्हवर 4-6, 6-3, 6-2, 6-4 अशी मात करीत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत 1968 नंतर उपांत्य फेरीत स्थान मिळविणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही विक्रमी 51 वी वेळ आहे. या दोघांत आता 14 वेळा गाठली पडली असून जोकोविचने व्हेरेव्हवर 9-5 अशी बाजी मारली आहे. ‘विशेषत: शेवटच्या गेममध्ये
ड्रॉप शॉट्स खेळण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे सलग तीन ते चार वेळा मी हा शॉट खेळला. टीव्हीवर दिसत नसले तरी कोर्टवर एका बाजूने जोराचा वारा वाहत होता. त्यामुळे एक फटका मारताना दोन फटक्यांची ताकद लावावी लागत होती. वैविध्य आणणे जास्त महत्त्वाचे होते,’ असे जोकोविच सामन्यानंतर म्हणाला. क्ले कोर्टवर ग्रँडस्लॅमवरील त्याचा हा 101 वा विजय होता. त्याची उपांत्य लढत अग्रमानांकित जेनिक सिनरशी होईल.
जोकोविच-सिनर यांच्यात आतापर्यंत आठ लढती झाल्या असून दोघांनीही प्रत्येकी 4 लढती जिंकल्या आहेत. मात्र सिनर गेल्या तीन लढतीत जोकोविचवर मान केली आहे. क्ले कोर्टवर जोकोविचने फक्त एकदाच 2021 मध्ये सिनरला हरविले होते. सिनरची या मोसमातील जय-पराजयाची कामगिरी 17-1 अशी आहे.सिनरप्रमाणे लॉरेन्झो मुसेटीनेही उपांत्य फेरी गाठली असल्याने स्पर्धेच्या खुल्या युगात इटलीच्या दोन खेळाडूंनी एकाच ग्रँडस्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. जोकोविचने 2023 मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याला एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2023 च्या यूएस ओपननंतरच्या पाच ग्रँडस्लॅममध्ये अल्कारेझ व सिनर यांनी जेतेपद पटकावले होते. अल्कारेझ हा येथील विद्यमान विजेता आहे.
दुसऱ्या एका उपांत्यपूर्व सामन्यात अग्रमानांकित जेनिक सिनरने प्रेंच ओपन स्पर्धा पहिल्यांदा जिंकण्याच्या दिशेने आगेकूच करताना कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकचा 6-1, 7-5, 6-0 असा पराभव केला. या विजयाने सिनर हा सहा ग्रँडस्लॅम्सची उपांत्य फेरी गाठणारा इटलीचा पहिला टेनिसपटू बनला आहे. ग्रँडस्लॅममधील सलग सामने जिंकण्याची संख्यात त्याने 19 पर्यंत वाढविली आहे. गेल्या वर्षीची ऑस्ट्रेलियन ओपन व यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धांचा त्यात समावेश आहे. ‘उपांत्य फेरीत ज्या पद्धतीने मी पोहोचलो त्याचा मला खूप आनंद आहे. ग्रँडस्लॅममधील उपांत्य सामने खूप खासच असतात. त्यामुळे त्याची मी आतुरतेने वाट पाहतोय,’ असे सिनर म्हणाला.
मिश्र दुहेरीत इराणी-वावासोरी अजिंक्य
मिश्र दुहेरीत तिसऱ्या मानांकित इटलीची सारा इराणी व आंद्रेया वावासोरी यांनी जेतेपद पटकावताना चौथ्या मानांकित इव्हान किंग व टेलर टाऊनसेंड यांच्यावर 6-4, 6-2 असा विजय मिळविला.