महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स...समाधानाचा...

06:00 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे भविष्याचा विचार जरुर हवा आणि त्या दृष्टीने विचारपूर्वक योग्य पावलेही उचलायला हवीत परंतु यामध्ये वर्तमानाकडे, आताच्या क्षणांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? हेही पहायला हवे. घडून गेलेल्या दु:खद क्षणांची सतत आठवण, भविष्याच्या विचाराची चिंता जर अस्वस्थ करु लागली तर आपले मानसिक आरोग्य आणि पर्यायाने शारीरिक आरोग्य धोक्यात येतेच आणि आपला वेळ वाया जातो आणि उदासीही येते.

Advertisement

आपले प्रश्न, आपल्या अडचणी ह्यांचा किती ताण आपल्या मनावर पडतो हे आपण त्या अडचणी कशापद्धतीने हाताळतो यावर अवलंबून असते. एक लक्षात घ्यायला हवे की प्रश्न, अडचणी, समस्या हे आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे. चला आता सारे प्रश्न मिटले हुश्श...असं कधीच होत नसतं. प्रश्न निर्माणं होणं तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यातूनही आपण काही शिकणं हा रोजच्या आयुष्याचाच एक भाग आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

Advertisement

यश, पैसा या पलीकडे...

यश, पैसा हे सर्वांनाच हवं असतं. आपल्या आयुष्यात सर्वांत महत्त्वाचे काय असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचे उत्तर थोडेफार वेगळे येईल. करिअर, नोकरी व्यवसायातील यश, नावलौकीक मिळवणं, कुटुंबाला प्राधान्य देणं, मानसिक समाधान मिळवणं या सगळ्यामध्ये आपण अग्रक्रम कशाला देतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. असंतुष्टता त्यातून येणारी अस्वस्थता, ताणतणाव, सतत तक्रारी करण्यापेक्षा समाधानाकडे कसे वळता येईल हे पहायला हवे.

मनाला लावा योग्य वळण

त्यासाठी वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करायला हवा, होते असे की एकाचवेळी आपण अनेक पातळ्यांवर विचार करत असतो. आपले मन भूतकाळात, भविष्यकाळात भरकटत असतं. वर्तमान काळातले कशाचे तरी बेत आखत असतं, कशाबद्दल तरी चुकचुकत असतं. होऊ शकणाऱ्या, न होऊ शकणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या मनात घोळत असतात. यातून मनावर ताण येत असतो. हे टाळण्यासाठी  आपल्या मनाला आपण वळण लावायला हवे तरंच आपण करत असलेल्या कामाचा दर्जा कितीतरी सुधारेल, काम जास्त चांगले झाल्याचे समाधान आपल्याला मिळेल.

छंद आवश्य जोपासा...

तसंच आपण आपल्यासाठी थोडासा तरी वेळ देतो आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. उपजीविकेसाठी काम करणे, धावपळीच्या या युगामध्ये जुळवुन घेत पुढे जाणे हे क्रमप्राप्तच आहे, परंतु ह्या कामांव्यतिरीक्तही केवळ आवड म्हणून एखादा छंद जोपासायला हवा. नाहीतर आयुष्य नीरस, कंटाळवाणे, रुक्ष वाटायला लागेल. नवीन शिकण्यासारख्याही आयुष्यात खूप गोष्टी असतात. वाचन लेखन करावं, प्राणी, पक्षी, झाडं, अन्य वेगळ्या विषयाचे ज्ञान मिळवता आले तर ते मिळवावं. छंदाच्या जोपासनेमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला वेगळं परिमाणही येतं आणि कामाचा ताण दूर होऊन मन हलकं आणि प्रफुल्लित होतं.

कृतज्ञता हवीच...

आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणं एवढ्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता न मानता आयुष्य अर्थपूर्ण होणं आणि त्याचं समाधान मिळणं खूप महत्त्वाचे आहे. समाधानासोबतच आपण किती कृतज्ञ राहतो, कृतज्ञता व्यक्त करतो याचा विचारही गरजेचा आहे. आपल्या रोजच्या वाटचालीत आपल्याला हे आयुष्य जगायला मिळते आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे असा विचार मनात येतो का? आपण तशी कृतज्ञता, जाणीव मनात ठेवली तर आपण जास्त आनंदात राहु शकु. रोज आपल्यासाठी कुणी ना कुणीतरी काहीतरी करत असतंच आपण दिसलो रे दिसलो की गोड हसणारं एखादं बाळ, ऑफिसच्या कामात किंवा एरव्ही ही मदत करणारे, आवर्जुन फोन करणारे आपले मित्र-मैत्रीणी, नातेवाईक. आपली काळजी करणारे, काळजी घेणारे आईवडील, आठवणीने एखादं गिफ्ट आणणारे, कौतुकाची शाब्बासकी देणारे सासु सासरे वा घरातले मोठे कुणी, सुट्टे पैसे नसतील तर ताई राहु द्या हो..म्हणणारा रिक्षावाला, नवऱ्याला आवडते म्हणून आठवणीनं एखादी गोष्ट घेऊन येणारी बायको आणि तिला काही आवडणारं घेऊन येणारा नवरा अशा अनेक बारीक सारीक गोष्टी म्हणा किंवा असे क्षण आपल्याला सुखावून जात असतात. त्या क्षणांविषयी कृतज्ञ रहावं.

आनंद शोधणारी दृष्टी हवी

कृत्रिमता न आणता छान मनमोकळेपणाने व्यक्तही व्हावं. हे व्यक्त होणं व समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणंही मन प्रसन्न करतं. आनंद, समाधान शोधायची दृष्टी आणि वृत्ती जोपासली तर आयुष्याचा आनंद घेता येतो आणि आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे याचे समाधानही लाभते. सुख, समाधान वा संतुष्ट असणं हे आपल्या मनातून यावं. भौतिक समृद्धी, सुखसोयी आपल्याला खरा आनंद मिळवून देऊ शकतीलच असे नाही.

स्वीकार, समाधान.....

कधीकधी अगदी सुरळीत, काहीसं एकसुरी असं आपलं आयुष्य चाललेलं असतं आणि सर्व ठीक चाललंय म्हणूनच की काय आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव आपल्याला रहात नाही वा बोथट होत जाते. आपली अशी माणसं असणं, गप्पा मारणं, एकमेकांची काळजी घेणं, मौजैत दिवस जाणं या सगळ्यातलं सुख आपण इतकं गृहीत धरुन चाललेलो असतो की कृतज्ञ असणंच विसरतो. एखाद्या दिवशी त्यातली एखादी गोष्ट वा व्यक्ती अचानक निघून गेली की त्या असण्यातलं जे सुख होतं ते प्रकर्षाने जाणवत राहतं. पण ते क्षण परत मिळणार नसतात. म्हणून आज जे आहे, जी माणसे आपल्यासोबत आहेत त्याविषयी जाणीवपूर्वक कृतज्ञ असावं. मिळालेल्या आयुष्याचा आनंद समाधानाने घ्यावा. अधिक प्रगती करण्याची इच्छा बाळगणं, स्वप्नं पाहणं यात वावगं काहीच नाही परंतु जे आहे त्याचा मनापासून स्वीकार, समाधान, कृतज्ञता हे सारं बाळगत सातत्यपूर्ण रीतीने एखादी गोष्ट करत राहिलो तर यशाचा टप्पा दूर नसतो हे लक्षात घ्यायला हवे हे मात्र निश्चित!

अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article