महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स..समाधानाचा...

06:28 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रमाची आई त्या दिवशी भेटायला आली ती थोडी काळजीतच. मॅडम, या रमाचं काय करावं मला सुचत नाही. किती समजावलं तिला पण ऐकतच नाही. हे हवं ते हवं...कीती ते? समाधान कसं ते नाहीच. सारखी तुलना..कुणी कार घेतली झाली कुरकुर सुरु, कुणी ट्रीपला गेलं हिची तुलना सुरु, कुणी नवा फ्लॅट घेतला तरी हिची कुरकुर सुरुच..वास्तविक पाहता कशालाही कमी नाही. देवानं सारं भरभरुन दिलं आहे. स्वत:च घर आहे, गाडी आहे, आर्थिक संपन्नता आहे. तरीही अस्वस्थता येते कुठुन हो? मॅडम खरंच कंटाळा आलाय. रमाची अशी तऱ्हा तर रमेश माझा मुलगा तो सारखा मस्तकावर तणाव असल्यासारखाच. त्याची मुलंही तशीच..सगळं असूनही कसले तणाव यांनाच माहिती. आमच्याजवळ काही नसतानाही आम्ही सुखी होतो असंच म्हणावं लागेल आता..कारण जिथे पाहते तिथे असंच चित्र दिसतंय..याचं टेन्शन, त्याचं टेन्शन..कितीही मिळालं तरी ते कमीच..हवं हवंचा हव्यास नुसता.

Advertisement

मी हसुन म्हटलं..हं..खरं आहे तुमचं.

Advertisement

मॅडम रमाला घेऊन भेटायला येणार होते असं म्हणून भेटीची वेळ ठरवुन रमाची आई निघून गेली.

तसं पहायला गेलं तर माणसाने बुद्धीच्या बळावर खूप प्रगती केली. वेगवेगळे शोध लावले. परंतु स्वत:च उभ्या केलेल्या या जीवनपद्धतीत, समाजव्यवस्थेत तो ताण तणावाच्या ओझ्याखाली दडपून गेला आहे. असं का व्हावं? आणि असं होणं टाळता येणार नाही का?

आपण कसे जगतो, वागतो, कसा विचार करतो याचा प्रामाणिक विचार केला तर असं लक्षात येईल की आपले बरेचसे ताणतणाव आपण आपल्या वागण्यानेच निर्माण केलेले असतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आपलं वागणं समजा विचारपूर्वक बदललं तर जास्त शांत, कमी तणाव असलेलं आयुष्य आपण जगू शकू का?

पहा हं..कुणी व्यक्त केलं अथवा नाही केलं तरी खूप जणांना असं वाटत असतं की आपण आहोत त्या परिस्थितीपेक्षा वेगळ्या परिस्थितीत असतो तर फार बरं झालं असतं. उदा. मी गावापेक्षा शहरात असतो तर अधिक प्रगती झाली असती, नवऱ्याचा व्यवसाय आहे त्यापेक्षा नोकरी हवी होती, नोकरी असणारा विचार करतो व्यवसाय असता तर बेस्ट झालं असतं, माझी पत्नी नोकरी करणारी असती तर बरं झालं असतं, तर एखाद्याला वाटतं अरे ही नोकरी करणारी नसती आणि नुसतं घरच सांभाळत असती तर किती बरं झालं असतं. आता पहा हं, यातलं किती बरोबर असतं? ज्या कुठल्या परिस्थितीत आपण असू, त्यापेक्षा वेगळं काही असायला हवं असं आपल्याला अनेक गोष्टींच्या बाबतीत वाटत राहतं किंवा असं म्हणूया की असं असतं तर बरं झालं असतं हे सातत्याने वाटत राहतं. तेव्हा एक लक्षात घ्यायला हवे की हे वाटण्यामागचे खरे कारण आपला असंतुष्ट स्वभाव असतो. विचार केला तर लक्षात येईल. समजा अशा व्यक्तीला अगदी हवी तशी परिस्थिती बदलली, तरी तिला/त्याला असंतुष्ट रहायला आणखी काहीतरी कारण नक्की सापडेल! असंतुष्ट स्वभाव..तो माणूस जिथे जाईल तिथे त्याच्या सोबत येणारच असतो. काही अपवादात्मक परिस्थिती वगळली तर शांत, संतुष्ट, समाधानी राहणं आपल्याच हातात असतं. वृत्तीमध्ये ते वसतं!

मला काय हवं आहे याची निवड सजगपणे मलाच करायला हवी. आपल्या प्रगतीसाठी परिश्रम घेणं, यशाची स्वप्न पाहणं यात वावगं काहीच नाही परंतु त्यासाठीचे प्रयत्न गरजेचे आहेत आणि वास्तवाला धरुन आपल्या अपेक्षा आहेत का हे तपासणेही गरजेचे आहे. I complained because i had no shoes till i saw a man who has no feet!

आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधान शोधायला शिकलं पाहिजे. जे आयुष्य मिळालं आहे त्याविषयी कृतज्ञ असावं, समाधानी असावं. जे आहे ते न स्विकारता आपण सतत नुसत्या तक्रारी करु लागलो तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे अशक्य होईल. कारण तसा प्रयत्न करण्यासाठी मनोवृत्ती उत्साही, आनंदी असणे गरजेचे आहे. ते असेल तर योग्य प्रयत्नांसोबत यश मिळण्याची शक्यता अधिक राहते.

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, समजा असंतुष्टता असेल आणि आपले आयुष्य जसं चाललं आहे त्यापेक्षा वेगळं असतं तर? अमुक गोष्ट माझ्याकडे असती तर? तसं नसतं तर अशा कल्पना, वेगवेगळ्या इच्छा करत राहिलो आणि समजा त्या पूर्ण जरी झाल्या, तरीही मग अशा स्वभावामुळे नंतर त्या परिस्थितीतले गुण-दोष आपल्याला जाणवू लागतील. असंतुष्टता माणसाला स्वास्थ्य देत नाही. आपली परिस्थिती सुधारण्याचा आवश्य प्रयत्न करावा परंतु सदैव असंतुष्ट वृत्ती ठेऊ नये. कारण असं जगताना आयुष्याची अनेक वर्षे उलटत जातात आणि आयुष्यात जे आनंदाचे क्षण समोर आहेत तेही हातून निसटून जातात.

आपली वागणूक सुधारणं हे आपल्याच हातात आहे. आपण जगत असतो वर्तमानात परंतु मन मात्र धावतं, रमतं घडून गेलेल्या गोष्टीत किंवा भविष्यकाळात!बरोबर ना?

भविष्याचा विचार जरुर हवा आणि त्या दृष्टीने विचारपूर्वक योग्य पावलेही उचलायला हवीत परंतु यामध्ये वर्तमानाकडे, आताच्या क्षणांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? हेही पहायला हवे. घडून गेलेल्या दु:खद क्षणांची सतत आठवण, भविष्याच्या विचाराची चिंता जर अस्वस्थ करु लागली तर आपले मानसिक आरोग्य आणि पर्यायाने शारीरिक आरोग्य धोक्यात येतेच आणि आपला वेळ वाया जातो आणि उदासीही येते.

आपले प्रश्न, आपल्या अडचणी ह्यांचा किती ताण आपल्या मनावर पडतो हे आपण त्या अडचणी कशापद्धतीने हाताळतो यावर अवलंबून असते. एक लक्षात घ्यायला हवे की प्रश्न, अडचणी, समस्या हे आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे. चला आता सारे प्रश्न मिटले हुश्श...असं कधीच होत नसतं. प्रश्न निर्माणं होणं तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यातूनही आपण काही शिकणं हा रोजच्या आयुष्याचाच एक भाग आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

यश, पैसा हे सर्वांनाच हवं असतं. आपल्या आयुष्यात सर्वांत महत्त्वाचे काय असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचे उत्तर थोडेफार वेगळे येईल. करिअर, नोकरी व्यवसायातील यश, नावलौकीक मिळवणं, कुटुंबाला प्राधान्य देणं, मानसिक समाधान मिळवणं या सगळ्यामध्ये आपण अग्रक्रम कशाला देतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. असंतुष्टता त्यातुन येणारी अस्वस्थता, ताणतणाव, सतत तक्रारी करण्यापेक्षा समाधानाकडे कसे वळता येईल याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात...

-अॅड. सुमेधा संजिव देसाई

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article