मलेशिया, न्यूझीलंडच्या नेत्यांशी एस. जयशंकर यांची चर्चा
आसियानच्या प्रादेशिक महत्त्वावर भारताचे लक्ष केंद्रित
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
आसियान शिखर परिषदेदरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि मलेशियाचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हाजी हसन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली.
क्वालालंपूर येथे झालेल्या असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स (आसियान) च्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान जयशंकर यांनी या बैठका घेतल्या. न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांच्याशी त्यांची भेट खूप सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने लक्सन यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारत आणि न्यूझीलंड मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध असल्याचे जयशंकर म्हणाले.

मलेशियासोबत सहकार्यावर भर
जयशंकर यांनी मलेशियाचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हाजी हसन यांचीही भेट घेत द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांनी म्यानमारमधील परिस्थितीवरही विचारांची देवाण-घेवाण केली. जयशंकर यांनी त्यांच्या मलेशियन समकक्षांना आसियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारत आणि मलेशियाला व्यापार, गुंतवणूक आणि जनतेमधील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मलेशियाच्या पंतप्रधानांशी चर्चा
जयशंकर यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशीही चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर आणि लोकांमधील संपर्क वाढविण्यावर भर दिला. जयशंकर यांनी सोशल मीडियावर यासंबंधीची माहिती देताना मलेशियाच्या पंतप्रधानांचे विचार भारत-मलेशिया सहकार्य मजबूत करण्यासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
मलेशिया यावर्षी आसियान गटाचा अध्यक्ष असून त्यांनी शिखर परिषदेचे आयोजन कले आहे. 11 देशांचा हा गट आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात प्रभावशाली संघटनांपैकी एक मानला जातो. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासारखे देश त्याचे संवाद भागीदार आहेत. भारत आसियान देशांसोबत राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी दीर्घकाळ काम करत आहे.