रायबाकीना, अल्कारेझ उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / सिनसिनॅटी
कझाकस्तानची इलिना रायबाकीनाने बेलारुसच्या टॉपसिडेड साबालेंकाचा पराभव करत येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी खुल्या 1000 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याच प्रमाणे स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने पुरुष एकेरीच्या शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. रायबाकीना आणि इटलीची जस्मिन पाओलिनी यांच्यात उपांत्य फेरीची गाठ होईल. पाओलिनीने अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणले.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने रशियाचा आंद्रे रुबलेव्हचा 6-3, 4-6, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 22 वर्षीय अल्कारेझने या सामन्यामध्ये 15 अनियंत्रीत चूका तसेच तीन दुहेरी चूका केल्या. 9 व्या मानांकीत रुबलेव्हने या लढतीत पहिला सेट गमविल्यानंतर दुसरा सेट 6-4 असा जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये अल्कारेझच्या बेसलाईन खेळामुळे रुबलेव्हला आपले गुण गमवावे लागले. अल्कारेझने एटीपीवरील मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत आपला सलग पंधरावा विजय नोंदविला आहे. अल्कारेझचा उपांत्य फेरीचा सामना जर्मनीच्या तृतिय मानांकीत अॅलेक्सझांडेर व्हेरेवशी होणार आहे. व्हेरेवने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टोरँटो स्पर्धेतील विजेत्या अमेरिकेच्या बेन शेल्टनचा केवळ 80 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या पराभवामुळे शेल्टनची गेल्या 9 सामन्यातील विजय घोडदौड खंडीत झाली.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कझाकस्तानच्या नवव्या मानांकीत रायबाकीनाने बेलारुसच्या विद्यमान विजेत्या आर्यना साबालेंकाचे आव्हान 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात रायबाकीनाने 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. अलिकडच्या कालावधीत रायबाकीना आणि साबालेंका यांच्यात झालेल्या 12 सामन्यातील रायबाकीनाचा हा पाचवा विजय आहे. दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पोलंडच्या इगा स्वायटेकने रशियाच्या 28 व्या मानांकीत अॅना कॅलिनस्कायचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. रशियाच्या व्हेरोनिका कुडेरमेटोव्हाने व्हेरेवा ग्रेचेव्हावर 6-1, 6-2 असा विजय मिळवित पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. इटलीच्या सातव्या मानांकीत जस्मीन पाओलिनीने अमेरिकेच्या टॉपसिडेड तसेच दोनवेळा ग्रॅंडस्लॅम जेतेपद मिळविणाऱ्या कोको गॉफचा 2-6, 6-4, 6-3 असा फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. कुडेरमेटोव्हा आणि पाओलिनी यांच्यात तसेच रायबाकीना व स्वायटेक यांच्यात उपांत्य फेरीच्या लढती होतील.