रेयान रेनॉल्ड्स अन् ह्यू जॅकमॅन एकत्र
शॉन लेवीची मिळणार साथ
एमसीयूचा चित्रपट ‘डेडपूल अँड वूल्वरिन’मध्ये रेयान रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमॅन एकत्र दिसून आले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. रेयान आता एका नव्या चित्रपटावर काम करत असून यात तो ह्यू जॅकमॅन आणि दिग्दर्शक शॉन लेवीसोबत काम करणार आहे. हा मार्व्हल्सचा चित्रपट नसेल असे रेयानने स्पष्ट केले आहे.
सुमारे एक वर्षापासून मी पटकथा लिहित आहे. हा चित्रपट मी ह्यू जॅकमॅन आणि शॉन लेवीसाठी लिहित असल्याचे रेयानने सांगितले आहे. रेयानने या चित्रपटाविषयी अधिक तपशील देणे टाळले आहे. परंतु आगामी प्रोजेक्टवरून काही संकेत दिले आहेत. या प्रोजेक्टला अद्याप कुठल्याही स्टुडिओकडून हिरवा झेंडा दाखविण्यात आलेला नाही. परंतु रेयानच्या मागील चित्रपटाची कामगिरी पाहता नवा प्रोजेक्ट बिगबजेटचा असेल असे मानले जात आहे.
डेडपूल 3 पूर्वी शॉन लेवी आणि रेनॉल्ड्सने एकत्र काम केले होते. फ्री गाइ आणि द अॅडम प्रोजेक्ट या चित्रपटाकरता दोघेही एकत्र आले होते. आता आगामी चित्रपटासाठी रेनॉल्ड्स उत्साहित आहे.