रशियाची एस-400 यंत्रणा नष्ट
वृत्तसंस्था/मॉस्को
युक्रेनच्या सैन्याने रशियाला मोठा झटका देत सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा एस-400 ला नष्ट केले आहे. युक्रेनच्या या यशाची कबुली रशियाच्या सैन्याने दिली आहे. युक्रेनच्या सैन्याने या हल्ल्यासाठी अमेरिकेकडून प्राप्त एटीएटीएमएस क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. ही क्षेपणास्त्रs दीर्घ पल्ल्यापर्यंत विध्वंस घडवून आणण्यास सक्षम आहेत. कुर्स्क भागात झालेल्या या हल्ल्यात एअर डिफेन्स सिस्टीम व एअर बेसला नुकसान पोहोचल्याचे रशियाने म्हटले आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी रशियाने दिली आहे. रशिया आतापर्यंत स्वत:च्या एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेला अजिंक्य ठरवत होता, परंतु युक्रेनच्या हल्ल्यामुळे त्याचा दावा फोल ठरला आहे.
अमेरिकेने युक्रेनला दीर्घ पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास अनुमती दिली आहे. यामुळे युक्रेन आणि रशियातील तणाव वाढला आहे. रशियाने प्रत्युत्तरादाखल आता उत्तर कोरियाच्या सैनिकांना युद्धभूमीवर तैनात केले आहे. तसेच रशियाने पहिल्यांदाच ओरेशनिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला आहे. युक्रेनने कुर्स्क भागातील लोटारेवका येथे तैनात एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य केले आहे. एस-40 ही रशियन यंत्रणा अमेरिकेच्या पेट्रियट क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेपेक्षा अधिक प्रभावी असल्याचा दावा केला जात होता. परंतु युक्रेनच्या हल्ल्यात ती नष्ट झाल्याने रशियाच्या दाव्याबद्दल संशय निर्माण झाला आहे. युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे सैनिकही मारले गेले आहेत. तर प्रत्युत्तरादाखल रशियाने युक्रेनवर 188 ड्रोन्सद्वारे हल्ले केले आहेत.