रशियाच्या आण्विक प्रमुखाचा स्फोटात मृत्यू
ब्लादिमीर पुतीन यांना मोठा झटका : इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये होता बॉम्ब : 30 ग्रॅम टीएनटीचा वापर
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे आण्विक सुरक्षा दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मंगळवारी मॉस्को येथे झालेल्या स्फोटात मृत्यू झाला आहे. जनरल किरिलोव्ह हे अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना नजीकच पार्क करण्यात आलेल्या स्कुटरमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात किरिलोव्ह यांच्यासोबत त्यांचा सहाय्यक देखील मारला गेला आहे.
हा स्फोट मॉस्कोतील राष्ट्रपती भवन क्रेमलिनपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर झाला आहे. स्फोटासाठी 300 ग्रॅम टीएनटीचा वापर करण्यात आला होता अशी माहिती रशियाच्या तपास यंत्रणेने दिली आहे. यंत्रणेने हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
किरिलोव्ह यांना एप्रिल 2017 मध्ये आण्विक दलाचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. किरिलोव्ह हे रशियाच्या रेडिएशन, केमिकल आणि बायेवेपन्स यासारख्या विभागांचे प्रमुख राहिले आहेत.
स्फोटामुळे मोठे नुकसान
स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने इमारतीच्या 4 मजल्यापर्यंतच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहहेत. 300 ग्रॅम टीएनटी स्फोटकाद्वारे सुमारे 17 मीटर (55 फूट) अंतरावरील काचेची खिडकीही तुटू शकते. याचबरोबर हे स्फोटक 1.3 मीटर अंतरावरील घराचे नुकसान घडवून आणू शकते. किरिलोव्ह यांच्या हत्येचा सूड निश्चितपणे उगविला जाणार असल्याचे रशियाच्या संसदेच्या उपाध्यक्षांनी सांगितले आहे.
4 महिन्यांमध्ये 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू
किरिलोव्ह हे मागील 4 महिन्यांमध्ये शत्रूचे शिकार ठरलेले तिसरे वरिष्ठ रशियन अधिकारी आहेत. 12 डिसेंबर रोजी रशियाचे क्षेपणास्त्र तज्ञ मिखाइल शेतस्की यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शेतस्की हे रशियन क्षेपणास्त्रांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रकल्पात सामील होते. ही क्षेपणास्त्रs युक्रेनच्या दिशेने डागण्यात येत होती. तर 28 सप्टेंबर रोजी ड्रोन तज्ञ कर्नल एलेक्सी कोलोमीतसेव हे मॉस्कोत मृत आढळून आले होते. कोलोमीतसेव हे रशियाच्या सैन्यत ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध होते.
युक्रेनवर डर्टी बॉम्ब निर्मितीचा आरोप
इगोर किरिलोव्ह यांनी ऑक्टोबर महिन्यात युक्रेनवर अमेरिकेच्या मदतीने डर्टी बॉम्ब तयार करण्याचा आरोप केला होता. डर्टी बॉम्ब तयार करण्यासाठी किरणोत्सर्गी सामग्रीचा वापर करण्यात येतो. तसेच त्यांच्या निर्मितीकरता खर्चही कमी येतो. यापूर्वी 2018 मध्ये अमेरिकेवर जॉर्जियामध्ये रशिया आणि चीन सीमेनजकी एक गुप्त जैविक अस्त्र प्रयोगशाळा चालविण्याचा आरोप झाला होता. त्याचवर्षी अमेरिकेने रशियावर युक्रेनमध्ये रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप केला होता. याच्या प्रत्युत्तरादाखल किरिलोव्ह यांनी रशियाने निर्धारित मुदतीपूर्वीच सप्टेंबर 2017 मध्येच स्वत:ची सर्व रासायनिक अस्त्रs नष्ट केल्याचा दावा केला होता. तर अमेरिकेने 2023 मध्ये स्वत:ची सर्व रासायनिक अस्त्रs नष्ट केली होती.
रासायनिक अस्त्रांचा वापर
युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिसेसने (एसबीयू) रशियाने सुमारे 5 हजारवेळा रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यातील 700 हून अधिक वेळा वापर चालू वर्षातील मे महिन्यातच झाला होता. किरिलोव्ह यांना सोमवारीच युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिसने युद्धात प्रतिबंधित रासायनिक अस्त्रांच वापर केल्याप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.