रशियाचे युक्रेनवर हल्ले चालूच
वृत्तसंस्था/मॉस्को
अमेरिकेने निर्बंध लादण्याचा इशारा दिला असला, तरी रशियाचे युक्रेनवर हल्ले चालूच असल्याचे दिसत आहे. गुरुवारी युव्रेनच्या महत्वाच्या पुरवठा केंद्रावर रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या साहाय्याने हल्ला चढविला. त्यात हे केंद्र उध्वस्त झाले आहे. तसेच युक्रेनचा आणखी काही भाग रशियाच्या ताब्यात गेला आहे. युव्रेनचे चासीव्ह यार हे महत्वाचे छोटे नगर रशियाने आपल्या हाती घेतले आहे. हे नगर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे मानले जाते. या नगरावर रशियाने ताबा मिळविल्याने युक्रेनची शक्ती आणखी कमी झाल्याचे बोलले जात आहे. या युद्धात या नगराने युक्रेनसाठी महत्वाची भूमिका साकारली होती. युक्रेनमधील महामार्ग, शस्त्रसाठे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी या केंद्राचे महत्व होते. युव्रेनच्या संरक्षण व्यवस्थेत या नगराचे स्थान अत्यंत निर्णायक होते. या शहरावर ताबा हा रशियाचा या युद्धातील मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया रशियाच्या सेनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनेही ही बाब मान्य केली.