रशियाचा युक्रेनमध्ये रेल्वेवर हवाई हल्ला
अनेक लोक जखमी झाल्याची भीती : ऊर्जा पायाभूत केंद्रांवरही निशाणा
वृत्तसंस्था/ कीव
रशियाने युक्रेनच्या उत्तरेकडील प्रदेशातील सुमी येथे हवाई हल्ला केला आहे. रशियन हल्ल्यांमध्ये एका प्रवासी रेल्वेला लक्ष्य करण्यात आले. रशियन हल्ल्यात रेल्वेस्थानकासह कीवला जाणाऱ्या एका प्रवासी रेल्वेला लक्ष्य करण्यात आले आहे. रेल्वेस्थानक परिसरात स्फोट घडवून आणल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचे प्रादेशिक गव्हर्नर ओलेह हीहोरोव्ह यांनी सांगितले. तसेच रशियाने युक्रेनच्या गॅस प्लांटवर मोठा हवाई हल्ला केल्यामुळे हजारो घरांना वीजपुरवठा खंडित झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून युक्रेनच्या रेल्वे पायाभूत सुविधांना सतत लक्ष्य करणाऱ्या रशियाच्या हवाई मोहिमेचा भाग म्हणून हा हल्ला नोंदवला जात आहे. रशिया जवळजवळ दररोज युक्रेनियन वाहतूक नेटवर्कवर हल्ले करत आहे. यापूर्वी रशियाने युक्रेनच्या राज्य गॅस आणि तेल कंपनी, नाफ्टोगाझच्या सुविधांवर 35 क्षेपणास्त्रे आणि 60 ड्रोन डागले होते. हे हल्ले खार्किव आणि पोल्टावा प्रदेशात झाले. त्यानंतर आता रेल्वेस्थानकावर हल्ले करत हाहाकार माजविण्यात आला. ह्रीहोरोव्ह यांनी सोशल मीडियावर जळत्या रेल्वे डब्याचा फोटो शेअर करत मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती दिली. या हल्ल्यात 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे गव्हर्नर ओलेह म्हणाले.
नाफ्टोगाझचे सीईओ सर्गी कोरेत्स्की यांच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बस्फोट असल्यामुळे गॅस उत्पादनावर गंभीर परिणाम झाला. या हल्ल्यामुळे अंदाजे 8,000 ग्राहकांची वीज खंडित झाली. या हल्ल्यात आमच्या अनेक प्रकल्पांचे गंभीर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी हे नुकसान खूप गंभीर आहे. या हल्ल्याचे कोणतेही लष्करी समर्थन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले
रशियाच्या सैन्याने रात्रभर युक्रेनच्या गॅस आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने मान्य केले. त्यांनी लष्करी-औद्योगिक स्थळांनाही लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. हिवाळा जवळ येताच, रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले तीव्र केल्यामुळे अनेक प्रदेशांमध्ये दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झाला आहे.
युक्रेनकडूनही प्रतिहल्ला
दरम्यान, युक्रेनियन ड्रोनने रशियन तेल शुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य केले आहे. नागरी आणि इतर कारणांसाठी गॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जात असूनही या प्लांटवर हल्ला केल्यामुळे झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यामुळे अनेक युक्रेनियन शहरांमधील हजारो घरांना वीज आणि गॅस पुरवठा खंडित झाला आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, युक्रेनने मोठ्या प्रमाणात गॅस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेननेही आपल्या प्रत्युत्तरात्मक कारवाया तीव्र केल्या आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत कीवच्या लष्कराने रशियामधील तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ले वाढवल्यामुळे रशियाच्या अनेक भागात इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. केवळ सप्टेंबरमध्ये युक्रेनने रशिया आणि त्याच्या ताब्यातील प्रदेशांमधील 19 तेल प्रतिष्ठानांवर ड्रोन हल्ले केले होते.