For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियाचे खासगी विमान अफगाणिस्तानात कोसळले

06:44 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियाचे खासगी विमान अफगाणिस्तानात कोसळले
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

सहा प्रवासी असलेले रशियाचे एक खासगी विमान अफगाणिस्तानात कोसळले आहे. प्रारंभी हे विमान भारताचे असल्याचे वृत्त पसरले होते. तथापि, ते खोटे असून या विमानाचा भारताशी कोणताही संबंध नाही, असे नागरी विमानवाहतून विभागाने स्पष्ट केले आहे. विमानातील प्रवाशांसंबंधी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विमानाचा शोध अफगाणिस्तानकडून घेतला जात आहे.

हे विमान शनिवारी संध्याकाळी अफगाणिस्तानच्या झेबाक जिल्ह्याच्या डोंगराळ भागात कोसळले असे अफगाणिस्तानच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या भागात बचाव पथके पाठविण्यात आली आहेत. झेबाक हा भाग अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून 250 किलोमीटर ईशान्येला आहे, असे स्पष्ट करण्यात आले. विमानातील प्रवाशांची ओळख अद्याप मिळालेली नाही. सहा प्रवाशांमध्ये 1 भारतीय असल्याचही वृत्त पसरले होते. पण, त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.

Advertisement

रशियाकडून माहिती

रशियाने दिलेल्या माहितीनुसार त्याचे एक डेसॉल्ट फाल्कन 10 या प्रकारचे विमान काही काळापासून बेपत्ता होते. त्यात चार कर्मचारी आणि दोन प्रवासी होते. रशियाही आपल्या विमानाचा शोध घेत आहे. हे विधान एका खेळाडूंच्या गटाचे होते अशीही माहिती रशियाच्या नागरी विमानवाहतून विभागाने दिली आहे.

गया येथे भरले इंधन

हे विमान मोरोक्को या देशात गेले होते. तेथून ते रशियाला परत चालले होते. वाटेत ते भारतात काही काळ थांबले. बिहारमधील गया येथील विमानतळावर या विमानाने इंधन घेतले होते. त्यानंतर ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे रशियाला परत चालले होते. पण अनेक तासांपूर्वी त्याचा भूमीशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्याची शोधशोध सुरु करण्यात आली होती. अखेर ते अफगाणिस्तानात पडले असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या देशाशी संपर्क करण्यात आला होता. अद्यापही विमानाचा ठावठिकाणा समजलेला नाही.

अफवांवर विश्वास नको

हे विमान भारताचे असल्याचे वृत्त ही निव्वळ अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवला जाऊ नये. विमानात भारतीय नागरीक असल्याचे वृत्तही निराधार असून ते विश्वासार्ह नाही. ते केवळ इंधन भरण्यासाठी भारतात काही काळ थांबले होते. या विमानाची नेंदणी मोरोक्कोत झाली होती. पण ते रशियाचे होते. त्यातील प्रवासी हे रशियन किंवा मोरोक्कन असू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.