16 टक्क्यांनी वाढले संरक्षण उत्पादन
मेक इन इंडिया मोहिमेला मिळाले यश : संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात सातत्याने वृद्धी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीच यासंबंधी शुक्रवारी माहिती दिली आहे. राजनाथ सिंह यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात 16.8 टक्क्यांची वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही महत्त्वपूर्ण वाढ देशाच्या संरक्षण उत्पादन मुल्यात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ ठरली आहे. चालू वर्षात संरक्षण उत्पादनाचे एकूण मूल्य 1.26 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
मेक इन इंडिया मोहिमेच्या अंतर्गत दरवर्षी नवनवे मैलाचे दगड गाठले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने 2023-24 आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनाच्या मूल्यात आतापर्यंतची सर्वाधिक वृद्धी नोंदविली आहे. 2023-24 मध्ये उत्पादनाचे मूल्य 1,26,887 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या उत्पादन मूल्यापेक्षा हा आकडा 16.7 टक्के अधिक आहे. भारतात आता अधिकाधिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन केले जात असल्याचे यातून स्पष्ट होते असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र
राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी क्षेत्राचे अभिनंदन पेले आहे. डीपीएसयू, संरक्षण सामग्री निर्माण करणारे अन्य पीएसयू आणि खासगी क्षेत्रासमवेत आमच्या संरक्षण क्षेत्राचे अभिनंदन. सरकार भारताला अग्रगण्य जगातिक संरक्षण उत्पादन केंद्राच्या स्वरुपात विकसित करण्यासाठी अधिक अनुकूल व्यवस्था निर्माण करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
संरक्षण उत्पादन निर्यातीतही वाढ
केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत 35 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादन निर्यातीसमवेत 1,75,000 कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन निर्मितीचे लक्ष्य बाळगले आहे. अनेक जागतिक कंपन्यांनी भारताला संरक्षण आणि एअरोस्पेस तंत्रज्ञान पुरविण्यासाठी रुची दाखविली आहे. ईज ऑफ डूडंग बिझनेस करण्यासाठी अनेक सुधारणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने 21 हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात देखील केली आहे, ज्यात त्या पूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारतात ‘मँगो शेल’ निर्माण करणार रशिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात रशियाचा दौरा क रणार आहेत. त्यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारताला मोठी भेट दिली आहे. रशिया आता भारतात रणगाड्यांचे मजबूत कवच फोडणाऱ्या गोळ्यांची निर्मिती सुरू करणार आहे. या गोळ्यांची निर्मिती खासकरून भारतीय सैन्यासाठी केली जात आहे. हे गोळ कुठल्याही चिलखती वाहनाला क्षणार्धात नष्ट करू शकतात. रशिया सरकारची मालकी असलेली रोसोबोरोनएक्सपोर्ट कंपनीने भारतात मँगो आर्मर-पियर्सिंग टँक राउंड्सची निर्मिती सुरू केली आहे. 3व्हीबीएम17 मँगो शेलमध्ये 3बीएम42 फिन-स्टेबलाइज्ड आर्मर-पियसिंग सब-कॅलिबर प्रोजेक्टाइल असून तो समग्र कवचाने युक्त आधुनिक रणगाड्यांना प्रभावीपणे नष्ट करू शकतो.