रशियाचे राष्ट्रपती पुतीन येणार भारत दौऱ्यावर
लवकरच तारखा घोषित होणार : महत्त्वाचा ठरणार दौरा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे आगामी काळात भारताचा दौरा करणार आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी यासंबंधी पुष्टी दिली आहे. रशियाकडून पुतीन यांच्या दौऱ्याच्या तारखांची घोषणा लवकरच होणार असल्याचे पेस्कोव यांनी म्हटले आहे. रशियाकडून आता पुतीन यांच्या भारत दौऱ्यासंबंधी तयारी सुरू आहे. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून पुतीन यांनी केवळ मंगोलिया या देशाचाचा दौरा केला आहे. अशास्थितीत भारतासाठीचा त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. पुतीन यांनी यापूर्वी 6 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत आयोजित 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी भारत दौरा केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालू वर्षातील जुलै महिन्यात मॉस्कोचा दौरा केला होता. हा दौरा 22 व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेसाठी झाला होता.
युक्रेनमधील कथित युद्धगुन्ह्यांसाठी पुतीन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. रोम कराराच्या अंतर्गत अटक वॉरंट जारी करण्यात आलेला व्यक्ती जर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या सदस्य देशाचा दौरा करत असेल तर त्याला ताब्यात घेण्याचे बंधन आहे. परंतु भारताने रोम करारावर स्वाक्षरी तसेच त्याचे समर्थनही केलेले नाही.