रशियाकडून आण्विक ड्रोनयुक्त पाणबुडी सादर
किनारी देशांना नष्ट करण्यास सक्षम : ड्रोनला ‘डूम्सडे मिसाइल’ असे नाव
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने स्वत:ची नवी आण्विक पाणबुडी सादर केली असून ती पोसाइडन आण्विक ड्रोनने युक्त आहे. या ड्रोनला डूम्सडे क्षेपणास्त्रही म्हटले जाते आणि हे किनारी देशांना नष्ट करण्यास सक्षम आहे. आण्विक पाणबुडी खाबारोवस्कला रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रेई बेलॉसोव यांनी सेवमाश शिपयार्डमध्ये लाँच केले आहे. सेवमाश शिपयार्डने यापूर्वी भारतासाठी आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौकेला रेट्रोफिट केले होते.
पाण्याच्या आत शस्त्रास्त्रs आणि रोबोटिक सिस्टीमयुक्त ही पहिली पाणबुडी असून ती रशियाला स्वत:च्या सागरी सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि महासागरांमध्ये स्वत:च्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यास सक्षम करणार असल्याचे उद्गार रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी काढले आहेत. खाबारोवस्क आण्विक पाणबुडीला सेंट्रल डिझाइन ब्युरो ऑफ मरीन इंजिनियरिंगकडून डिझाइन करण्यात आले आहे. नौदलाच्या अभियानांना मूर्त रुप देण्यासाठी ही पाणबुडी पाण्याच्या आत आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करते. यात विविध उद्देशांसाठी रोबोटिक सिस्टीम सामील आहे.
आधुनिक शस्त्रास्त्रs अन् रोबोट सिस्टीम
रशियाने सादर केलेली पाणबुडी पाण्यात शस्त्रास्त्रs आणि रोबोट सिस्टीम नेणार आहे. यामुळे सागरी सीमांचे रक्षण होईल आणि जगातील कुठल्याही कोपऱ्यात रशियाच्या हितांना सुरक्षित ठेवणार आहे. मागील आठवड्यात रशियाने पोसाइडन नावाच्या आण्विक ड्रोनचे परीक्षण केले होते. सामान्य पाणबुडी किंवा टॉरपीडोपेक्षा वेगवान, खोल समुद्रातून जाणारे आणि आंतरखंडीत अंतरापर्यंत जाऊ शकणारा हा ड्रोन होता. तर नवी खाबारोवस्क श्रेणी पाणबुडी याचा मुख्य वाहक असणार आहे. हा ड्रोन छोट्या आण्विक रिअॅक्टरने संचालित होतो.