येथे आहे ‘अमृताची विहिर’
एका थेंबाने बरे होतात आजार
तुम्ही चमत्कारावर विश्वास ठेवता का? लोकांचे आजार बरे करून त्यांना त्रासापासून वाचविणारी शक्ती असते असे तुम्हाला वाटते का? जगात काही लोक नास्तिक आहेत, तर अनेक जण आस्तिकही आहेत. काही आजारांवरील उपचार डॉक्टरांनाही करणे शक्य होत नाही. अशास्थितीत लोक प्रार्थनेचा आसरा घेतात. परंतु सध्या असेच एक ठिकाण चर्चेत असून हे उत्तर आयर्लंडमधील तीन विहिरींशी संबंधित आहे.
या विहिरींचे जादुई पाणी पिण्यासाठी देशविदेशातून लोक येत असतात. या विहिरी चमत्कारिक शक्तींनी भरलेल्या असल्याचे मानले जाते. उत्तर आयर्लडच्या पोर्टाफेरीनजीक या तीन विहिरी शतकांपासून अस्तित्वात आहेत. प्रत्येक विहिरीचे पाणी वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करण्यासाठी ओळखले जाते. एका संताने स्वत:च्या शक्ती या विहिरींमध्ये सोडून याच्या पाण्याला अमृत पेल्याची वदंता आहे.
या विहिरींना सेंट महाईगे यांचे नाव देण्यात आले आहे. सातव्या शतकापासून या विहिरी अनेक लोकांच्या श्रद्धेचे केंद्र ठरल्या आहेत. या विहिरी कधीपासून अस्तित्वात आहेत याची माहिती नाही. या विहिरींवरील दगडावर अनेक प्रकारची माहिती नमूद असून यात आसपासच अनेक संतांचे समाधीस्थळ असल्याचा उल्लेख आहे. सेंट महाइगे यांनी विहिरींनजीकच चमत्कार करत अनेक लोकांना मुक्ती मिळवुन दिली होती असे बोलले जाते.
विहिरींचा जीर्णोद्धार
या विहिरी अत्यंत प्राचीन आहेत, परंतु 1970 च्या मध्याला यांचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. विहिरींना सिमेंटने मजबुती देण्यात आली, त्यानंतर नजीकच एक प्रेयर हाउस निर्माण करण्यात आले. दर रविवारी येथे लोक येत असतात. तिन्ही विहिरींचे पाणी वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जाते. पहिल्या विहिरीच्या पाण्याने लोक हात धुतात, दुसऱ्या विहिरीच्या पाण्याने डोळे स्वच्छ करतात आणि तिसऱ्या विहिरीचे पाणी पित असतात.