अमेरिकेच्या योजनेला रशियाचा विरोध
वृत्तसंस्था/संयुक्त राष्ट्रसंघ
हैती या देशातील टोळी हिंसाचार रोखण्यासाठी केनियाच्या नेतृत्वात कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलाचे रुपांतर आंतरराष्ट्रीय शांतीसेनेत करण्याच्या अमेरिकेच्या योजनेला रशिया आणि चीन यांनी विरोध केला आहे. सध्या हैतीमध्ये टोळी हिंसाचार शिगेला पोहचला आहे. काही शस्त्रसज्ज टोळ्यांनी हैतीच्या अधिकृत सैन्यावरही हल्ले चढविले आहेत. चार विमानेही त्यांनी निकामी केली आहेत. हैतीची राजधानी पोर्ट आऊ प्रिन्स या शहराचा 85 टक्के भाग सध्या या टोळ्यांच्या हातात आहे. या टोळ्यांनी राजधानीच्या अवती-भोवतीच्या परिसरातही आपले हातपाय पसरण्यास प्रारंभ केल्याने त्यांना रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणून अमेरिकेने तेथील आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल पाठविले आहे.
रशिया आणि चीनचाही या हिंसाचाराला विरोध आहे. या दोन देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीची मागणी केली आहे. या बैठकीत हैती या देशात शांतता कशी निर्माण होईल यावर विचार केला जावा, असे प्रतिपादन या दोन देशांनी केले आहे. तथापि, हैतीच्या जवळ असणाऱ्या केनिया या देशाच्या नेतृत्वातील सुरक्षा दलाचे रुपांतर आंतरराष्ट्रीय शांतीसेनेत केल्यास ते उपयुक्त ठरणार नाही, असेही मत या दोन देशांनी व्यक्त केले आहे.
हस्तक्षेप नको
एक महिन्यापूर्वीच या भागात आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे इतक्या लवकर त्याचे आंतरराष्ट्रीय शांतीसेनेत रुपांतर केल्यास तो सध्याच्या सुरक्षा दलाच्या कार्यात हस्तक्षेप ठरणार आहे. त्यामुळे चीनचा अशा कोणत्याही प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी काही कालावधीनंतर पुन्हा चर्चा करता येणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया चीनचे प्रतिनिधी गेंग शुआंग यांनी दिली.
अमेरिकेच्या हस्तक्षेपाची चिंता
हैतीतील सुरक्षा दलाचे रुपांतर आंतरराष्ट्रीय शांतीसेनेत केल्यास तेथे अमेरिकेचा प्रभाव वाढेल. शांतीसेनेच्या माध्यमातून अमेरिकेला त्या देशात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल, अशी रशिया आणि चीनची चिंता आहे. अमेरिकेच्या प्रस्तावाला या दोन देशांनी विरोध करण्याचे हे अंतस्थ कारण आहे. तथापि, ते रशिया आणि चीनकडून हे खरे कारण उघड करण्यात आलेले नाही, असे तज्ञांचे मत आहे.