For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धादरम्यान रशियाने बदलला संरक्षणमंत्री

06:00 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
युद्धादरम्यान रशियाने बदलला संरक्षणमंत्री
Advertisement

सर्गेई शोइगु यांना पदावरून हटविले : बेलोसोव्ह यांची नियुक्ती

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

युक्रेनसोबत युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी दीर्घकाळापासून स्वत:चे सहकारी असलेले देशाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांना पदावरून हटविण्याची घोषणा केली आहे. ब्लादिमीर पुतीन यांच्या पाचव्या कार्यकाळाच्या प्रारंभासोबत मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेच्या हिस्स्याच्या स्वरुपात हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्गेई शोइगु हे 2012 पासून रशियाचे संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत होते. पुतीन यांनी 68 वर्षीय शोइगु यांना रशियाच्या शक्तिशाली सुरक्षा परिषदेचा प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. तर शोइगु यांच्या जागी सैन्याची पार्श्वभूमी नसलेले आंद्रेई बेलोसोव्ह यांना संरक्षण मंत्रिपद सोपविण्यात आले आहे. आंद्रेई हे रशियाचे पंतप्रधान राहिले आहेत.

Advertisement

पुतीन हे शोइगु यांना रशियाच्या शक्तिशाली सुरक्षा परिषदेत निकोलाय पेत्रुशेव्ह यांच्या जागी पाहू इच्छित असल्याचे समजते. पेत्रुशेव्ह यांना कुठले पद देण्यात आले हे अद्याप समोर आलेले नाही. शोइगु यांना पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जाते. याचमुळे त्यांना संरक्षण मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.

वॅगन प्रमुखाच्या बंडाची पार्श्वभूमीवर

शोइगु हे 1990 च्या दशकात आपत्कालीन स्थिती आणि आपत्ती दिलासा मंत्रालयाचे प्रमुख या नात्याने प्रसिद्धीस आले होते. परंतु संरक्षणमंत्री म्हणून ते मजबूत रणनीतिकार ठरलेले नाहीत. 2022 मध्ये युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर शोइगु यांची स्थिती कमकुवत झाली होती. 2023 मध्ये युक्रेन युद्धावरून रशियाचे खासगी सैन्य वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी शोइगु यांच्या विरोधात जाहीरपणे टिप्पणी करत बंड केले होते. प्रिगोझिन यांनी शोइगु यांना वृद्ध विदूषक संबोधित त्यांना पदावरून हटण्याची मागणी केली होती. ऑगस्ट 2023 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथून मॉस्कोच्या दिशेने विमानप्रवास करताना झालेल्या  कथित दुर्घटनेत येवगेनी मारले गेले होते.

अर्थतज्ञाकडे संरक्षण मंत्रालयाची धुरा

शोइगु यांच्या जागी सैन्य अनुभव नसलेले अर्थतज्ञ आंद्रेई बेलोसोव्ह यांची नियुक्ती झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संरक्षणमंत्री म्हणून एका अर्थतज्ञाची नियुक्ती होणे क्रेमलिनच्या बदलत्या प्राथमिकतांना दर्शविते. रशियाच्या अर्थव्यवस्थेला युद्धामुळे झळ पोहोचली आहे. तर नवोन्मेषाच्या आवश्यकतेमुळे बेलोसोव्ह यांची निवड झाल्याचा दावा क्रेमलिनने केला आहे.

Advertisement
Tags :

.