रशियाने लावला कर्करोग लसीचा शोध
लवकरच करणार विनामूल्य वितरणास प्रारंभ, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या उपयोगाने संशोधन
वृत्तसंस्था / मॉस्को
कर्करोगावर (कॅन्सर) मात करणाऱ्या नव्या लसीचा शोध लावल्याचे प्रतिपादन रशियातील संशोधकांनी केले आहे. ही लस एमआरएनए पद्धतीची असून तिचे वितरण आगामी वर्षाच्या पूर्वार्धापासून विनामूल्य करण्यात येणार आहे. ज्यांना कर्करोग झालेला आहे, त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यासाठी ही लस शोधण्यात आली असून ती इतर लसींप्रमाणे सर्वांना टोचली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही लस ‘प्रिव्हेंटिव्ह’ नसून ‘क्युरेटिव्ह’ प्रकारातील आहे.
रशियाच्या गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर या संस्थेने या लसीचे संशोधन आणि परीक्षण केले आहे. परीक्षणाचे सर्व टप्पे या लसीने यशस्वीरित्या पार केले आहेत. त्यामुळे आता ती वितरणासाठी सज्ज झाली आहे. फेब्रुवारी किंवा मार्च 2025 पासून तिच्या वितरणाला प्रारंभ होणार आहे. ती कर्करोगाच्या रुग्णांना विनामूल्य वितरीत केली जाईल. यासाठी रशियाच्या प्रशासनाने देशभरात केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया ही लस शोधण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे, अशी घोषणा त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या घोषणेनुसार आता ती उपलब्ध करण्यात आली आहे.
कोणत्या कर्करोगांवर उपयुक्त
ही लस कर्करोगाच्या नेमक्या कोणत्या प्रकारांवर परिणामकारक ठरणार आहे, याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. इतर अनेक देश अशा प्रकारच्या लसी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी ब्रिटनच्या सरकारने जर्मनीच्या बायोएनटेक कंपनीशी करार केला असून ही कंपनीही अशी लस निर्माण करण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
काही लसी सध्या उपलब्ध
पॅलिलोमाव्हायसरविरोधातील काही लसी आज उपलब्ध आहेत. पॅलिलोमाव्हायरस अनेक प्रकारच्या कर्करोगांना जन्म देतो. त्याच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य या लसी करतात. त्यामुळे कर्करोगाचे मूळच नष्ट होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. भारतही अशा लसींची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग
कर्करोगावरील लसींच्या निर्माणकार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे लसनिर्मितीसाठी येणारा खर्च आणि लागणारा कालावधी बऱ्याच प्रमाणात कमी होईल असे प्राथमिक प्रयोगांवरून दिसून येते. विशेषत: व्यक्तिगत उपयोगाच्या लसी निर्माण करण्याच्या कामी हे तंत्रज्ञान वरदान सिद्ध होत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आवश्यकता आणि शरिराची ठेवण वेगवेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या तीव्रतेच्या लसी त्यांना मानवतात. अशा प्रकारच्या व्यक्तिगत उपयोगाच्या लसी संबंधित व्यक्तीची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन निर्माण केल्या जातात. सध्या ही प्रक्रिया बरीच खर्चिक आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वसाधारण लसीपासून केवळ एका तासाच्या कालावधीत व्यक्तिगत लस निर्माण करणे शक्य झाले आहे.
अनेक कंपन्या कार्यरत
जगातील अनेक मोठ्या औषध निर्मिती कंपन्याही कर्करोगावरच्या लसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांच्याकडून केला जात आहे. सध्या ज्या कर्करोगांच्या प्रकारावर औषध नाही, त्यांच्यावर या कंपन्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मॉडर्ना, तसेच मर्क अँड कंपनी या कंपन्या मेलानोमा नामक त्वचेच्या घातक कर्करोगावर लस निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. काही वर्षातही ही गुणकारी लस उपलब्ध होऊ शकेल. या लसीमुळे मेलानोमाच्या रुग्णांमधला मृत्यूचा धोका निम्म्याने कमी होईल, असे या कंपन्यांच्या संशोधकांचे म्हणणे आहे. कर्करोग उपचार क्षेत्रात लवकरच मोठी क्रांती होण्याची शक्यता या संशोधनांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत अनेक कर्करोगप्रतिबंधक लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कर्करोग लसीत रशिया आघाडीवर
ड अनेक प्रकारांच्या कर्करोगांवर उपाय असणारी लस शोधल्याचे प्रतिपादन
ड कालांतराने ही लस जगातील इतर देशांनाही उपलब्ध करण्याची योजना
ड विविध प्रकारांच्या विकारांवर लसी निर्माण करण्याचे भारताकडूनही प्रयत्न