युक्रेनच्या अवदीवका शहरावर रशियाचा कब्जा
राष्ट्रपती पुतीन यांचा मोठ्या विजयाचा दावा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने युक्रेनचे शहर अवदिवकावर कब्जा केला आहे. कीव्हच्या सैन्यप्रमुखाने युव्रेनचे सैन्य या शहरातून मागे हटल्याची पुष्टी दिली आहे. यामुळे हे शहर पूर्णपणे रशियाच्या नियंत्रणात आले आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी अलदिवका शहरावरील नियंत्रणानंतर आनंद व्यक्त करत याला एक महत्त्वपूर्ण विजय ठरविले आहे. मागील वर्षी मे महिन्यात बखमुत शहरावर कब्जा केल्यावर रशियाच्या सैन्याचा हा सर्वात मोठा विजय असल्याचे मानले जातेय.
युक्रेनला अमेरिकेकडून सैन्य सहाय्य मिळण्यास सातत्याने विलंब होत असताना रशियाला अवदिवका शहरावर कब्जा करण्यास यश मिळाले आहे. युक्रेनच्या सैन्याकडे सध्या मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याची कमतरता निर्माण झाली आहे.
लेफ्टनंट जनरल एंड्री मोर्डविचेव यांच्या नेतृत्वात सैनिकांनी अवदिवका शहरावर पूर्णपणे कब्जा केला आहे. युक्रेनने मागील 24 तासांमध्ये अवदिवका येथे 1500 हून अधिक सैनिक गमावले असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
अवदिवका शहर हे युक्रेनच्या सैन्यासाठी एक मजबूत संरक्षण केंद्र होते. अवदिवका शहरावर रशियाने कब्जा केल्याने युक्रेनच्या युद्धक्षमतेवर आता प्रतिकूल प्रभाव पडणार आहे. अधिकाधिक लोकांचा जीव वाचविण्याकरता सैनिकांना मागे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे युक्रेनच्या सैन्याचे प्रमुख अलेक्झेंडर सिरस्की यांनी सांगितले आहे. तर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी या पराभवाचे खापर शस्त्रास्त्रांच्या कमतरतेवर फोडले आहे. दुर्दैवाने युक्रेनला शस्त्रास्त्रs कमी पडू लागली आहेत. दीर्घ पल्ल्याची शस्त्रास्त्रs आणि क्षेपणास्त्रांची मोठी कमतरता निर्माण झाली असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
अवदिवका शहरात भीषण संघर्ष
रशिया-युक्रेन युद्धात पूर्व सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे अवदिका शहराचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने येथे मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव केला आहे. रशियाच्या कब्जातील युक्रेनचे शहर डोनेत्सकपासून अवदिका केवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे. अवदिवका शहराची लोकसंख्या सुमारे 34 हजार इतकी होती. युद्ध सुरू झाल्यावर येथील लोकांनी मोठ्या संख्येत पलायन केले होते.