उपनगरातील रस्त्याकडेला फेरीवाल्यांची गर्दी
कोल्हापूर :
कोल्हापूर शहराबरोबर उपनरातीलही रस्त्यांच्या बाजूला फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. फूटपाथला लागून किंवा फूटपाथवरच केबिन, त्या केबिनच्या चार बाजूंनी ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी बॅनरचे छत अशी रचना आणि त्याच्या पुढे ग्राहकांची वाहने असे चित्र दिसून येत आहे. यामुळे निम्यापेक्षा अधिक मुख्य रस्ता व्यापून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अशा बेशिस्त फेरीवाल्यांना आताच शिस्त लावली नाही तर भविष्यात उपनरातील रस्ते सुध्दा अरुंद होऊन वाहतूकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्या फेरीवाल्यांना व्यवसायासाठी शहरात जागा मिळणे मुश्किल आहे. यामुळे नवीन फेरीवाले आता उपनराकडे वळत आहेत. तसेच उपनरातील नागरिकही रस्त्याच्या बाजूला केबिन थाटून लहान मोठा व्यवसाय करत आहेत. पण केबिन उभारत असताना बहुतेक ठिकाणी वाहतूकीला होणाऱ्या अडथळयांचा विचार होताना दिसत नाही.
शहराच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या राजेंद्रनगर-मोरेवाडी, शेंडापार्क चौक या परिसरात हे चित्र दिसून येत आहे. शेंडा पार्कात भाजी मंडई सुरु आहे. सायंकाळी या ठिकाणी मंडई भरते. याबरोबरच रस्त्याच्या पूर्वेला केबिनही उभारल्या आहेत. आर.के.नगर, आयसोलशन, एसएसी बोर्ड, सुभाषनगर या मार्गाने होणारी वाहतूक शेंडापार्क चौकातून होते. यामुळे चौकात सतत गर्दी असते. विशेषत: सायंकाळच्या वेळी चौक गजबजतो. यावेळी बहुतांश वाहने रस्त्याच्या बाजूला थांबवली जात असल्याने गर्दी होते.
- मोकाट जनावरांचा रस्त्यात ठिय्या
राजेंद्रनगर ते मोरेवाडी चौक परिसरात भटकी जनावरे मोठ्या संख्येने फिरत असतात.याशिवाय घोडीही सोडली जातात.अनेकवेळा भटकी जनावरे रस्त्यामध्येच ठिय्या मांडतात. यामुळे वाहतूकीस अडथळा होतो. तसेच घोड्यामुळे यापूर्वी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. भटक्या जनावरांची समस्या सोडवणे महापालिकेसमोर आव्हान आहे.